जागे व्हारे सारेजण…. करा करा मतदान……. या कवितेच्या माध्यमातून मतदार जनजागृती…..
जिंतूर/प्रतिनिधी/ जिंतूरच्या शहरी भागात गर्दी असलेल्या ठिकाणी, चौकाचौकात व विशेषतः मतदानाची टक्केवारी कमी असलेल्या भागामध्ये स्वीप पथकाने घोषणा, कविता, गीतगायनाद्वारे मतदार जनजागृती केली. निवडणूक आयोग यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी संजयसिंह चव्हाण, उपविभागीय अधिकारी सेलू तथा निवडणूक निर्णय अधिकारी जिंतूर नगर परिषद शैलेश लाहोटी, तहसीलदार जिंतूर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी राजेश सरवदे, मुख्याधिकारी उमेश ढाकणे, उपमुख्याधिकारी अनिल समिंद्रे, नायब तहसीलदार निवडणूक सुग्रीव मुंढे, मिडिया पथक प्रमुख नायब तहसीलदार प्रशांत राखे, गटशिक्षणाधिकारी तथा मतदान जनजागृती पथक प्रमुख त्र्यंबक पोले यांच्या नियोजनानुसार मतदार जनजागृती कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. मतदार जनजागृती अभियान यासाठी भोंगा व जनजागृती बॅनर असलेले फिरते वाहन तयार करण्यात आले आहे. या वाहनाच्या माध्यमातून जिंतूर नगर परिषदेच्या विविध भागांमध्ये मतदार जनजागृती पथकाद्वारे जनजागृती केली जात आहे. मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावावा या संदर्भात प्रबोधन केले जात आहे. विविध घोषणा, गीते, कविता या माध्यमातून मतदारांना मतदान करण्यासाठी प्रेरित केल्या जात आहे. लोकशाही बळकट आणि सक्षम करण्यासाठी निवडणुकीतील मतदान प्रक्रियेत मतदारांचा जागरूकतेने उत्स्फूर्त मोठ्या सहभागाला विशेष महत्त्व आहे. प्रत्येक निवडणुकीत सर्व मतदारांनी जागरूकतेने आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. जागरूक मतदार लोकशाही बळकट करतात. सक्षम लोकशाहीमध्ये मतदानाची टक्केवारी प्रचंड मोठी असते. मतदानाचा दिवस उत्सवासारखा साजरा केला जातो.
