हुतात्मा विश्वनाथ राजहंस औद्योगिक प्रशिक्षण संस्था सोयगाव येथे कारगिल विजय दिवस उत्साहात
आत्ताच एक्सप्रेस
सोयगाव/प्रतिनिधी/ हुतात्मा विश्वनाथ राजहंस औद्योगिक प्रशिक्षण संस्था सोयगाव येथे शनिवारी (ता.२६) जुलै कारगिल विजय दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थेचे प्राचार्य पंडीत मस्के साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम अत्यंत प्रेरणादायी वातावरणात पार पडला.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून दुग्ध उत्पादक उद्योजक व संस्थेच्या व्यवस्थापन समितीचे स्वीकृत सदस्य लोकेश पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. आपल्या प्रभावी भाषणात त्यांनी देशसेवेचे महत्त्व अधोरेखित करताना, राणी दुर्गावती यांच्या शौर्याचे प्रेरणादायी उदाहरण विद्यार्थ्यांसमोर मांडले.
त्याचप्रमाणे, आयएमसीचे स्वीकृत सदस्य विकास देसाई यांनीही उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधींबाबत माहिती देताना, रोजगार समाचार व एम्प्लॉयमेंट न्यूज हे साप्ताहिक संस्थेमध्ये उपलब्ध करून देण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या विशेष भागात, कारगिल विजय दिवसाचे औचित्य साधून सोयगाव तालुक्यातील निंबायती येथील माजी सैनिक सिताराम पाटील आणि सोयगाव येथील दिलीप बारी यांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.
सिताराम पाटील यांनी आपल्या अनुभवातून युद्धभूमीवरील शस्त्रास्त्रांविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. तसेच, सैन्य दलामधील आयटीआय व्यवसायांचे महत्त्व आणि त्या क्षेत्रातील रोजगार संधींबाबत सखोल मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमास रेणुका कुलकर्णी, निदेशक दिलीप बागुल, निता दांदळे , सोमनाथ उगले , दर्शन ठाकूर सर, शेख रफिक, पोपट रावते सर यांच्यासह संस्थेचे सर्व कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सोमनाथ उगले (मुख्य लिपिक)यांनी तर आभार प्रदर्शन नीता दांदळे (शिल्प निर्देशक) यांनी केले.