मुलांसाठी योग,ध्यान व हनुमान चालीसा उपक्रमाला उत्सवात सुरुवात
जालना/प्रतिनिधी/ नवीन वर्षाच्या निमित्ताने घुंगर्डे हादगाव येथे मुलांमध्ये संस्कार,आरोग्य व सकारात्मकतेची रुजवणूक करण्याच्या उद्देशाने हंस फाउंडेशनतर्फे आयोजित करण्यात आलेला उपक्रमाला उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात करण्यात आली. या उपक्रमाअंतर्गत हनुमान मंदिरात लहान मुलांसाठी सामूहिक हनुमान चालीसा पठण,सोपे प्राणायाम, योग व ध्यान (मेडिटेशन) घेण्यात आले. कार्यक्रमात मोठ्या संख्येने लहान मुलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या उपक्रमामुळे मुलांमध्ये शिस्त, एकाग्रता, मनःशांती तसेच सुदृढ आरोग्याच्या चांगल्या सवयी विकसित होण्यास मदत होईल, असे मत उपस्थित पालकांनी व्यक्त केले. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व मुलांना हंस फाउंडेशनतर्फे हनुमान चालीसा पुस्तिका भेट स्वरूपात देण्यात आली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गावातील पालकवर्ग व जागृत नागरिकांनी मोलाचे सहकार्य केले.
नवीन वर्षाची सुरुवात संस्कार, आरोग्य व सकारात्मक विचारांनी करण्याचा हा उपक्रम स्तुत्य असून, पुढील काळातही असे उपक्रम नियमितपणे राबविण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. यावेळी ह.भ.प. प्रभातसिंग परिहार महाराज यांनी मुलांना हनुमान चालीसेचे महत्त्व समजावून सांगितले.
कार्यक्रमास हंस फाउंडेशनचे प्रतिनिधी माऊली दोबोले, शिवाजी बाम्हणे, योगेश हेंद्रे, गावातील तरुण गोविंद कोळेकर, गजानन पवार, बाबासाहेब कोळेकर, तसेच भागवत परिवार व इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. याच उपक्रमाचा भाग म्हणून प्रत्येक शनिवारी सायंकाळी 7 वाजता हनुमान मंदिरात सर्व मुलांसाठी सामूहिक हनुमान चालीसा पठण, योग व ध्यानाचा कार्यक्रम नियमितपणे आयोजित करण्यात येणार आहे. तरी सर्व पालकांनी आपल्या मुलांना वेळेवर मंदिरात पाठवून या उपक्रमात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.