उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कृषी यांत्रिकीकरण घटकांतर्गत लाभार्थ्यांना ट्रॅक्टर व औजाराचे वितरण
बारामती, दि.३१ : राज्यातील शेतकऱ्यांच्या अंगी कुशलता असून ते अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन शेतमालाच्या उत्पादनात वाढ करीत आहेत; अशा प्रगतशील तंत्रज्ञान आणि त्यामाध्यमातून कृषीक्षेत्रात होणाऱ्या बदलाविषयी इतर शेतकऱ्यांनीही माहिती घ्यावी, असे आवाहन पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
माळेगाव सहकारी साखर कारखाना येथे आयोजित कार्यक्रमात श्री. पवार यांच्या हस्ते कृषी यांत्रिकीकरण सन २०२५-२६ घटकाअंतर्गत निवड झालेल्या प्रातिनिधिक स्वरूपात ५१ लाभार्थ्यांना डि.बी.टी.द्वारे अनुदानावर ट्रॅक्टर व औजाराचे वितरण करण्यात आले.
यावेळी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे, उप विभागीय कृषी अधिकारी तुळशीराम चौधरी, माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षा संगीता कोकरे, संचालक मंडळ, सभासद, विविध बँकेचे अधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
श्री. पवार म्हणाले, कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीमुळे (एआय) निर्णयप्रक्रिया डेटा आधारित असल्यामुळे अचूक होते, पिकातील दोष लवकर ओळखता येतात , त्यामुळे पिकाला लागणारे घटकांबाबत वेळेत माहिती मिळते. वीज आणि पाणी वापरात बचत होते, शेतमालाच्या उत्पादनातही वाढ होणार आहे, त्यामुळे वेगाने बदलणाऱ्या काळानुरुप शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर दिला पाहिजे, याकरीता राज्य शासनाच्या वतीने सहकार्य करण्यात येईल.
राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी राज्य शासनाने ३२ हजार कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. अजूनही राज्यातील विविध भागात पाऊस पडत असून अशा भागातील झालेल्या नुकसानाचे पंचनामे सुरु करण्यात आहे, त्यामुळे अशा शेतकऱ्यांनाही मदत करण्याकरिता अधिकचा निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. शेतकऱ्यांना अडचणीतून बाहेर काढण्याकरिता कर्जमाफीच्या अनुषंगाने एक समिती गठीत केली आहे. या समितीने केलेल्या शिफारशीच्या आधारावर पुढची प्रक्रिया करून ३० जून २०२६ पर्यंत कर्जमाफी करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.
बारामती तालुक्यातील सुमारे २५ हजार लाभार्थ्यांची निवड महाडीबीटी पोर्टलवर करण्यात आली असून यावर्षी ३५ कोटी रुपयाचे अनुदान करण्यात येणार आहेत. याप्रमाणे राज्यातही अनुदान वितरित करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्नवाढ तसेच विविध योजनांकरिता ५ हजार कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतलेला आहे.
राज्यातील विविध योजनेतील लाभार्थ्यांना सुमारे १ लाख कोटी रुपयांचा लाभ देण्यात येत आहे. यामध्ये शेतकऱ्याच्या ३, ५ आणि ७.५ अश्वशक्ती असलेल्या कृषी पंपांसाठी वीज देयकाकरिता २५ हजार कोटी रुपये, पीएम-सन्मान निधी करिता ७.५ हजार कोटी रुपये, माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांकरिता ४५ हजार कोटी रुपये, दिव्यांग लाभार्थ्यांना प्रतिमाह अडीच हजार, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना आणि संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना प्रतिमाह दीडहजार रुपये, ७५ वर्षांवरील नागरिक सर्व प्रकारच्या बसेसमध्ये १०० टक्के मोफत प्रवास, महिलांना बसेसमध्ये ५० टक्के सवलतीने प्रवास अशा विविध योजनांचा समावेश आहे, असेही श्री. पवार म्हणाले.
