आज जालन्यात ‘गुरू पाठीराखा’ दिंडी माहितीपटाचे प्रदर्शन
जालना : आषाढी वारी निमित्त वारकरी धर्म संकीर्तन सेवा प्रतिष्ठान कुंभारझरी ता.जाफराबाद येथून स्वग्राम ते पंढरपूर येथे जाणारी पायी दिंडी शनिवारी जालना मुक्कामी येत आहे. दिंडीच्या स्वागतासाठी मराठी भाषा व वाड्मय विभाग श्रीमती दानकुंवर महिला महाविद्यालय आणि मराठी विभाग, जे.ई.एस.महाविद्यालय,जालना यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि. २१) जालना शहरात ‘ गुरु पाठीराखा ‘ या आषाढ वारी माहितीपट प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
श्रीमती दानकुंवर महिला महाविद्यालयात सायंकाळी पाच वाजता या माहिती पटाचे प्रदर्शन होणार असून या समारंभाच्या अध्यक्षस्थानी दानकुंवर हिंदी कन्या विद्यालय समितीचे अध्यक्ष महेंद्रकुमार गुप्ता असणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणुन ज्येष्ठ साहित्यिक बसवराज कोरे यांची उपस्थिती असणार आहे. सुप्रसिद्ध लेखक, कवी, पत्रकार विनोद जैतमहाल, छत्रपती संभाजीनगर येथील सुप्रसिद्ध कवी श्रीधर नांदेडकर प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असणार आहेत. कुंभारझरी येथील दिंडी मार्गदर्शक ह.भ.प.सोनुने गुरुजी, जे.ई.एस.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश अग्निहोत्री, सुप्रसिद्ध फिल्म एडिटर अभिजित चव्हाण यांची या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती असणार आहे.
जालना शहर आणि परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी पालखी दर्शन व माहितीपट प्रदर्शन आणि कीर्तन श्रवणाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्रीमती दानकुंवर महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.डी.तळेकर, जे.ई.एस.महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख डॉ.यशवंत सोनुने, श्रीमती दानकुंवर महिला महाविद्यालयातील मराठी भाषा व वाड्मय विभाग प्रमुख डॉ.वासुदेव उगले यांनी केले आहे.
