गुगुळ पिंपरी ग्रामपंचायत महिला सदस्य अपात्र
जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचा महत्त्वपूर्ण निर्णय
सेनगाव/प्रतिनिधी/ सेनगाव तालुक्यातील गुगुळ पिंपरी येथील ग्रामपंचायत महिला सदस्य पार्वती नारायण इंगोले यांना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी अपात्र ठरवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. ग्रामपंचायत अधिनियम कलम १४ अंतर्गत दाखल करण्यात आलेल्या प्रकरणावर सुनावणी करून हा आदेश दि. १५ जुलै २०२५ रोजी पारित करण्यात आला.
या प्रकरणात असे निदर्शनास आले की, पार्वती नारायण इंगोले यांच्या मुलांच्या नावाने गावठाण गट क्रमांक ७४० मधील शासकीय जागेवर अनधिकृत ताबा ठेवण्यात आला होता. या जागेमध्ये मालमत्ता क्रमांक ५३८ (सचिन नारायण इंगोले) व मालमत्ता क्रमांक ५३९ (रामेश्वर नारायण इंगोले) अशी प्रत्येकी १०८९ चौ. मीटर क्षेत्रफळाची घरे असल्याचे आढळून आले. ही जागा शासकीय गावठाण जमीन असून त्यावर अतिक्रमण करून वापर केला जात असल्याचा ठपका ठेवण्यात आला.
महत्त्वाचे म्हणजे, संबंधित महिला सदस्यांच्या नावावर स्वतःचे खासगी मालकीचे घर असतानाही शासकीय जमिनीवर अतिक्रमण करण्यात आले होते. तसेच, ही बाब ग्रामपंचायत निवडणुकीदरम्यान जाणीवपूर्वक लपवून प्रशासनाची दिशाभूल करण्यात आल्याचेही स्पष्ट झाले. गावठाण मालमत्तेची माहिती लपवून ग्रामपंचायत सदस्यत्व ईश्वर चिठ्ठीवर प्राप्त केल्याचा आरोप सिद्ध झाल्याने त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले.
या प्रकरणाची तक्रार गुगुळ पिपरी येथील बालाजी दशरथराव देशमुख यांनी दि. २५ ऑगस्ट २०२३ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल केली होती. त्यानंतर प्रकरणाची सखोल चौकशी व सुनावणी करण्यात आली.
या संपूर्ण प्रकरणात अॅडव्होकेट अजय उर्फ बंटी देशमुख यांनी याचिकाकर्त्यांच्या वतीने प्रभावीपणे बाजू मांडत प्रकरण दाखल केले आणि कायदेशीर बाबी सक्षमपणे मांडून उत्कृष्ट निकाल मिळवून दिला.
जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या या निर्णयामुळे ग्रामपंचायत स्तरावर शासकीय जमिनीवरील अतिक्रमण व चुकीच्या माहितीच्या आधारे पद मिळवण्याच्या प्रकारांना आळा बसणार असल्याची चर्चा परिसरात होत आहे. तसेच, हा निर्णय इतर लोकप्रतिनिधींना इशारा देणारा असल्याचे मत नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
