जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक संपन्न
जालना : ग्राहकांच्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक जिल्हाधिकारी अशिमा मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न्न झाली. या बैठकीस जिल्हा पुरवठा अधिकारी तथा सदस्य सचिव सविता चौधर, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी डी.एस. दिवटे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. कापसे, अशासकीय सदस्य रमेश तारगे, विजय जाधव, सतिश पंच, नंदकुमार देशपांडे, बाबासाहेब सोनटक्के शालिनी पुराणिक, संजय देशपांडे, मधुकर सोनोने, दिलीप लाड, मोहन इंगळे, बालाप्रसाद जेथलिया आदींची बैठकीस उपस्थिती होती.
यावेळी जिल्हाधिकारी श्रीमती मित्तल यांनी, जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे मुख्य उद्दिष्ट ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण करणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे, तसेच ग्राहकांच्या तक्रारींवर त्वरित आणि प्रभावीपणे सोडविणे हा आहे. त्यामुळे ग्राहकांच्या हितांचे संरक्षण करण्यासाठीची हि बैठक असल्याने ग्राहकांच्या तक्रारींचे अर्ज या बैठकीत सादर करावेत. तसेच जिल्ह्यातील राशन दूकानात ग्राहकांना नियमानुसार किती रॅशन मिळते याबाबतचे दर्शनी भागात माहिती फलक लावावेत. राशन कार्डसाठी शासनाने जे नियमानुसार दर ठरविले आहेत, त्यानुसारच पैसे घ्यावेत. जास्तीचे पैसे घेवू नये. तसेच स्वयंपाकाचे गॅस सिलेंडर डिलीव्हर करणारे ग्राहकांकडून अतिरिक्त रुपयांची मागणी करतांना निदर्शनास आल्यास संबंधीतावर फौजदारी कारवाई करण्यात येणार. सर्व संबंधीत विभागांनी त्यांच्याशी संबंधीत तक्रारींची दखल घेवून, याबाबत योग्य कार्यवाही करुन अहवाल सादर करण्याच्या सूचना यावेळी जिल्हाधिकारी श्रीमती मित्तल यांनी दिल्या.
बैठकीत समिती विषयांवर चर्चा करण्यात आली. यामध्ये नवीन राशन कार्ड, राशन कार्ड दुरुस्ती, नाव वगळणे, जुने राशन कार्ड ऑनलाईन करण्यसाठी पैसे आकारणे. तसेच निश्चित कार्यालयीन वेळेत पुरवठा विभाग बंद असणे. सर्व तहसिल पुरवठा कार्यालयात सिसिटीव्ही कॅमेरा बसविणे, राशन दुकानदार निश्चित केलेल्या प्रमाणात राशन वाटप होत नाही. घरगुती गॅस सिलेंडरचा व्यावसायिक ठिकाणी वापर. नियमितपणे शिवभोजन केंद्रांची तपासणी, बदनापूर तालूक्यातील मौ. वाहेगाव येथील विविध समस्या, जालना शहरातील नागरीकांना चुकीच्या रक्कमेची वीज बिले, गॅस वितरण कंपनीकडून घरगुती गॅस डिलिव्हरी करतांना 40 ते 50 अधिक रुपयाची मागणी, व्यापाऱ्यांचे बचत प्रमाणपत्र लायसन्स नुतणीकरण व सेक्युरिटायझेशन अॅक्ट 2002 नुसार कार्यवाही, जालना शहरात व जिल्ह्यात महा ई-सेवा केंद्र चालकाकडून जास्तीचे पैसे घेत असल्याने ग्राहकांची होणारी लुट. जालना शहरामधील मुंद्राक व स्टॅम्प विक्रेते जास्तीचे पैसे घेणे आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.
प्रारंभी जिल्हा पुरवठा अधिकारी तथा सदस्य सचिव सविता चौधर यांनी प्रास्ताविकात जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे उद्दीष्ट सांगुन मागील बैठकीबाबत झालेल्या कार्यवाहीची माहिती दिली.
