छत्रपती संभाजीनगरमध्ये औद्योगिक व घरगुती ग्राहकांना वीजपुरवठ्यासाठी ट्रान्सफॉर्मर क्षमतेत मोठी वाढ
छत्रपती संभाजीनगर : शहर व परिसरातील विजेच्या वाढत्या वापरामुळे यंत्रणेवर येणारा ताण आणि त्यातून वीजपुरवठा खंडित होण्याची समस्या सोडविण्यासाठी महावितरणतर्फे शिवाजीनगर, सातारा व रोशनगेट या निवासी क्षेत्रांसोबतच वाळूज औद्योगिक वसाहतीमध्ये अवघ्या पंधरा दिवसांत २५ एमव्हीएची पॉवर ट्रान्सफॉर्मर क्षमता वाढविण्यात आली. यामुळे २५ हजार घरगुती ग्राहकांसोबत १५०० औद्योगिक ग्राहकांना अधिक दर्जेदार वीजपुरवठा होईल.
महावितरणचे तत्कालिन संचालक (संचालन) अरविंद भादिकर व प्रभारी सहव्यवस्थापकीय संचालक धनंजय औंढेकर यांच्या नेतृत्वात मुख्य अभियंता पवनकुमार कछोट, अधीक्षक अभियंता मनीष ठाकरे, बीना सावंत, महेश पवार, कार्यकारी अभियंता प्रसाद महातोले, अविनाश चांदेकर, तत्कालिन कार्यकारी अभियंता महेश पाटील यांच्यासह अभियंते व कर्मचाऱ्यांनी ही कामगिरी केली.
वाळूज एमआयडीसीतील महावितरणच्या 33 केव्ही ई सेक्टर उपकेंद्रात 10 एमव्हीए क्षमतेचे दोन व 5 एमव्हीएचा एक पॉवर ट्रान्सफॉर्मर होता. त्याद्वारे सुमारे 752 उद्योगांना वीजपुरवठा करण्यात येतो. एम सेक्टर उपकेंद्रात 10 एमव्हीएचा एका व 5 एमव्हीएचे दोन पॉवर ट्रान्सफॉर्मर होते. त्याद्वारे सुमारे 631 उद्योगांना वीजपुरवठा करण्यात येतो. मात्र दिवसेंदिवस वाढणाऱ्या विजेच्या मागणीमुळे सुरळीत वीजपुरवठा करण्यात अडथळा निर्माण होत होता. त्यामुळे पॉवर ट्रान्सफॉर्मरची क्षमता वाढविण्यात आली. आता ई व एम उपकेंद्रांची एकत्रित क्षमता अनुक्रमे 30 व 25 एमव्हीए झाल्याने औद्योगिक ग्राहकांना अखंडित व दर्जेदार वीजपुरवठा मिळणार आहे.
शिवाजीनगर परिसरातील ग्राहकांना अखंडित व दर्जेदार वीजपुरवठा करण्यासाठी महावितरणने 33 केव्ही उपकेंद्रातील पॉवर ट्रान्सफॉर्मरची क्षमतावाढ केली. शिवाजीनगर उपकेंद्रात 10 एमव्हीएचा ट्रान्सफॉर्मर नुकताच कार्यान्वित करण्यात आल्यामुळे 7 हजार वीजग्राहकांना दिलासा मिळाला आहे. शिवाजीनगर उपकेंद्रात याआधी 5 एमव्हीए क्षमतेचे प्रत्येकी दोन पॉवर ट्रान्सफॉर्मर होते. उपकेंद्रातून परिसरातील जवळपास 14 हजार ग्राहकांना वीजपुरवठा करण्यात येतो. मात्र दिवसेंदिवस वाढणारी ग्राहकांची संख्या व विजेच्या मागणीमुळे मोरेश्वर व देवगिरी फीडरवर सुरळीत वीजपुरवठा करण्यात अडथळा निर्माण होत होता. आता उपकेंद्रातील दोन्ही पॉवर ट्रान्सफॉर्मरची एकत्रित क्षमता 15 एमव्हीए झाल्याने ग्राहकांना दर्जेदार वीजपुरवठा मिळणार आहे.
सातारा व देवळाई परिसरातील ग्राहकांना अखंडित व दर्जेदार वीजपुरवठा करण्यासाठी महावितरणने 33 केव्ही उपकेंद्रातील पॉवर ट्रान्सफॉर्मरची क्षमतावाढ केली आहे. यामुळे 12 हजार वीजग्राहकांना दिलासा मिळाला आहे. सातारा उपकेंद्रात 10 व 5 एमव्हीए क्षमतेचे दोन पॉवर ट्रान्सफॉर्मर होते. उपकेंद्रातून सातारा व देवळाई परिसरातील जवळपास 28 हजार ग्राहकांना वीजपुरवठा करण्यात येतो. उपकेंद्रात 5 एमव्हीएच्या पॉवर ट्रान्सफॉर्मरची क्षमतावाढ करून तो 10 एमव्हीए करण्यात आला. आता उपकेंद्रातील दोन्ही पॉवर ट्रान्सफॉर्मरची एकत्रित क्षमता 20 एमव्हीए झाल्याने ग्राहकांना अखंडित व दर्जेदार वीजपुरवठा मिळणार आहे.
रोशनगेट परिसरातील ग्राहकांना अखंडित व दर्जेदार वीजपुरवठा करण्यासाठी महावितरणने 33 केव्ही उपकेंद्रातील पॉवर ट्रान्सफॉर्मरची क्षमतावाढ केली आहे. रोशनगेट उपकेंद्रातील 10 एमव्हीएचा ट्रान्सफॉर्मर नुकताच कार्यान्वित करण्यात आला. यामुळे 6 हजार वीजग्राहकांना दिलासा मिळाला आहे. रोशनगेट उपकेंद्रात 10 व 5 एमव्हीए क्षमतेचे दोन पॉवर ट्रान्सफॉर्मर होते. उपकेंद्रातून परिसरातील जवळपास 11 हजार ग्राहकांना वीजपुरवठा करण्यात येतो. मात्र दिवसेंदिवस वाढणारी ग्राहकांची संख्या व विजेच्या मागणीमुळे जसवंतपुरा फीडरवर परिसरास सुरळीत वीजपुरवठा करण्यात अडथळा निर्माण होत होता. यावर उपाय म्हणून उपकेंद्रात 5 एमव्हीएच्या पॉवर ट्रान्सफॉर्मरची क्षमतावाढ करून तो 10 एमव्हीए करण्यात आला. आता उपकेंद्रातील दोन्ही पॉवर ट्रान्सफॉर्मरची एकत्रित क्षमता 20 एमव्हीए झाल्याने ग्राहकांना अखंडित व दर्जेदार वीजपुरवठा मिळणार आहे.
