अंबड व घनसावंगी ऊस उत्पादक शेतकरी व कामगार संघर्ष समितीची निदर्शने
अंबड/प्रतिनिधी/ अंबड व घनसावंगी ऊस उत्पादक शेतकरी व कामगार संघर्ष समितीने कामगारांच्या थकीत वेतनासाठी आणि इतर मागण्यांसाठी आवाज उठवला आहे. समितीने साखर कारखाना प्रशासनावर गंभीर आरोप करत, कामगारांना वेळेवर वेतनवाढ आणि महागाई भत्ता दिला जात नसल्याचे म्हटले आहे.
१७ सप्टेंबर २०२५ रोजी समितीने दिलेल्या निवेदनानुसार, १ एप्रिल २०२४ रोजी महाराष्ट्र शासनाने, कामगार प्रतिनिधी आणि साखर कारखानादार यांच्यात झालेल्या बैठकीत कामगारांना १० टक्के वेतनवाढ देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार, कामगारांना २५०० ते २६०० रुपये वेतनवाढ मिळणे अपेक्षित होते. परंतु, कुठल्याही साखर कारखान्याने या आदेशाची अंमलबजावणी केली नाही. विशेषतः, कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखाना, लि., अंकुश नगर या कारखान्याने या आदेशाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप समितीने केला आहे.
समितीने केलेल्या आरोपांनुसार, कामगारांना नियमित वेतनवाढ दिली जात नाहीये, तसेच महागाई भत्ताही देण्यात येत नाही. याचा थेट परिणाम कामगारांच्या आर्थिक परिस्थितीवर होत आहे. याव्यतिरिक्त, कामगारांच्या कल्याण मंडळाच्या अखत्यारीत येणाऱ्या सर्व अधिकारांपासून त्यांना वंचित ठेवले जात आहे, असेही निवेदनात म्हटले आहे.
संघर्ष समितीच्या वतीने, कामगार प्रतिनिधींनी या प्रकरणी महाराष्ट्र शासन आणि साखर कारखाना प्रशासनाकडे न्याय मागितला आहे. १ एप्रिल २०२४ पासूनची थकीत वेतनवाढ त्वरित द्यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
या गंभीर प्रश्नावर प्रशासनाने लवकर लक्ष घालून कामगारांना त्यांचे हक्क मिळवून द्यावेत, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही समितीने दिला आहे.