झाड कोसळून व केबल फॉल्टमुळे काही भागांचा वीजपुरवठा खंडित
महावितरणने युद्धपातळीवर काम करत केला वीजपुरवठा पूर्ववत
छत्रपती संभाजीनगर : ग्रामीण पोलिस कॉलनीजवळ वीजवाहिन्यांवर झाड कोसळून तर सिडको बस स्टँड परिसरात भूमिगत केबल नादुरुस्त झाल्याने शहरातील काही भागांचा वीजपुरवठा बुधवारी (30 एप्रिल) खंडित झाला. महावितरणच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेऊन वीजपुरवठा पूर्ववत केला.
सिडको बस स्टँड परिसरात 33 केव्ही वाहिनीच्या भूमिगत केबलमध्ये बिघाड झाला. सकाळी 9 वाजता महावितरणच्या अभियंते-कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन पर्यायी केबलचे काम सुरू केले. त्यासाठी एन-4 व म्हाडा या 33 केव्ही वाहिन्यांचा वीजपुरवठा खबरदारीचा उपाय म्हणून सकाळी 10 ते दुपारी साडेबारा वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आला. यामुळे एन-4 व म्हाडा उपकेद्रांवरील सुमारे 30 ते 35 हजार ग्राहकांचा वीजपुरवठा बंद होता. पर्यायी केबलचे काम करून साडेबारा वाजता वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. अधीक्षक अभियंता मनीष ठाकरे, कार्यकारी अभियंता महेश पाटील, अतिरिक्त कार्यकारी अभियंता दिनेश चावडा, प्रशांत नाखले, सहायक अभियंता विजय काथार, जितेंद्र पन्नाभट्टी, प्रदीप निकम, अक्षय अबदलवार यांनी वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी परिश्रम घेतले.
सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास पोलिस कॉलनी एन-10 येथे सुराणानगर व कटकट गेट फिडरवरील कट पॉईंट पोलवर झाड पडल्याने दोन्ही पोल पूर्णपणे वाकून तारा तुटल्या. यामुळे कटकटगेट, एसटी कॉलनी, सुराणानगर, बायजीपुरा परिसरातील साडेपाच हजार ग्राहकांचा विद्युतपुरवठा खंडित झाला. पडलेले झाड बाजूला करण्यासाठी अग्निशमन दलास निरोप देण्यात आला. परंतु त्यांचे झाड कापण्याचे यंत्र बंद पडल्याने त्यांना झाड तोडता आले नाही. त्यानंतर खासगी व्यक्ती बोलावून झाड तोडण्यात आले यामध्ये तीन तास गेले. झाड तोडल्यानंतर झाडात अडकलेल्या तारा काढून एक पोल उभा तारा जोडण्यात आला. सायंकाळी साडेपाच वाजता वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला. अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजीव कोंडगुळी, सहायक अभियंता अभय अरणकल्ले यांच्यासह कर्मचारी व ठेकेदारांनी वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी परिश्रम घेतले.
