Sunday, October 26, 2025
Homeऔरंगाबादवैविध्यपूर्ण अभियानाचा गौरव

वैविध्यपूर्ण अभियानाचा गौरव

वैविध्यपूर्ण अभियानाचा गौरव
                 यावर्षीचा दादासाहेब फाळके पुरस्कार  दक्षिण भारतातील लोकप्रिय ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांना जाहीर करण्यात आला आहे. अलिकडेच, भारत सरकारने २०२३च्या दादासाहेब फाळके पुरस्कारासाठी नामांकन जाहीर केली होते. त्यानंतर मोहनलाल यांच्या नावाची सरकारतर्फे घोषणा करण्यात आली.  दादासाहेब फाळके पुरस्कार निवड समितीच्या शिफारशीनुसार ही घोषणा करण्यात आली. हा पुरस्कार भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार मानला जातो. अभिनेते मोहनलाल यांना आज म्हणजे २३ सप्टेंबर २०२५ रोजी ७१ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये हा पुरस्कार प्रदान केला जाईल. दक्षिण भारताने  भारतीय मनोरंजन विश्वाला अनेक महान कलाकार दिले त्यातीलच एक म्हणजे मोहनलाल. २१ मे १९६० रोजी केरळातील एलनथूर येथे येथे जन्मलेले मोहनलाल यांचे पूर्ण मोहनलाल विश्वनाथ नायर असे आहे. शालेय वयापासूनच  अभिनयाची आवड असलेल्या मोहनलाल यांनी १९७८ साली थिरनोत्तम या मल्याळम चित्रपटातून चित्रपटसृष्टीत प्रवेश केला मात्र हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकला नाही त्यामुळे १९८० साली  प्रदर्शित झालेला मंजिल विरिंजा पुक्कल हा त्यांचा पहिला प्रदर्शित चित्रपट ठरला. विशेष म्हणजे या चित्रपटात त्यांनी नायकाची नाही तर खलनायकाची भूमिका केली मात्र ही भूमिका त्यांनी अशाप्रकारे वठवली की नायकापेक्षा त्यांनी साकारलेला खलनायकच भाव खाऊन गेला. हा चित्रपट त्यांच्यामुळेच हिट झाला. याच भूमिकेने त्यांना  चित्रपटसृष्टीचे कवाडे उघडून दिले. या चित्रपटाद्वारे  मल्याळम चित्रपट सृष्टीला नवा ताकदीचा अभिनेता मिळाला. हा चित्रपट त्यांच्यासाठी टर्निंग पॉईंट ठरला. त्यांच्या घरासमोर निर्माते दिग्दर्शकाच्या रांगा लागल्या. त्यांचे चित्रपट एकापाठोपाठ हिट होऊ लागले. यशस्वी चित्रपटांची मालिकाच त्यांनी सुरू केली.  दर पंधरा दिवसांनी त्यांचा एक चित्रपट प्रदर्शित होऊ लागला. विशेष म्हणजे सलग चित्रपट प्रदर्शित होऊनही प्रेक्षकांनी त्यांच्या चित्रपटाकडे पाठ फिरवली नाही कारण प्रत्येक चित्रपटात त्यांनी वेगवेगळी भूमिका साकारली. अभिनयातील वैविध्यामुळे ते आपली लोकप्रियता टिकवून ठेवू शकले. राजविंटे माकन या चित्रपटात त्यांनी साकारलेली डॉनची भूमिका त्यांचा कारकिर्दीतील मैलाचा दगड ठरली. या चित्रपटानंतर त्यांची लोकप्रियता गगनाला भिडली. पुलीमुर्गम हा त्यांनी अभिनय केलेला चित्रपट तर सुपरहिट ठरला.  हा चित्रपट त्याकाळात सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला . या चित्रपटाने त्या काळात १३० कोटी रुपयांची कमाई केली. दृश्यम या चित्रपटातील त्यांची भूमिका देखील लक्षवेधक ठरली. हा चित्रपट नंतर हिंदीतही आला ज्यात मोहनलाल यांची भूमिका अजय देवगण यांनी केली. अभिनयासाठी त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. सर्वोत्कृष्ट अभिनयाच्या राष्ट्रीय पुरस्कारासाठी तर त्यांना नऊ वेळा नामांकन मिळाले त्यापैकी ४ वेळा त्यांना हा पुरस्कार मिळाला. वानप्रस्थम या चित्रपटात त्यांनी कथकली नृत्य सादर करणाऱ्या कलाकाराची भूमिका साकारली. या चित्रपटातील त्यांच्या अभिनयासाठी त्यांना पहिल्यांदा सर्वोत्कृष्ट अभिनयाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्यांनी जवळपास ३०० पेक्षा अधिक मल्याळम चित्रपटात भूमिका केल्या. केवळ मल्याळम नाही तर हिंदीसह अन्य दक्षिण भाषीय चित्रपटातही त्यांनी भूमिका केल्या. दक्षिणेतील इतर अभिनेत्यांप्रमाणे त्यांचेही हजारो फॅन्कलब आहेत. परदेशातही त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे.  जवळपास चाळीस वर्षांहून अधिक काळ  अभिनय क्षेत्रात घालवलेल्या मोहनलाल यांना भारत सरकारने पद्मश्री सारखा मानाचा पुरस्कार देऊनही गौरविले आहे. आता दादासाहेब फाळके पुरस्काराने    गौरवून सरकारने त्यांच्या वैविध्यपूर्ण अभिनय कारकिर्दीचा योग्य गौरव केला आहे. दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनेते मोहनलाल यांचे मनापासून अभिनंदन!
-श्याम ठाणेदार
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments