गंगापूरमध्ये सार्वजनिक नवरात्र उत्सवाचा भव्य शुभारंभ – कीर्तन व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल
आत्ताच एक्सप्रेस
गंगापूर/प्रतिनिधी/ गंगापूर शहरातील सार्वजनिक नवरात्र उत्सव समितीच्या वतीने यंदाही उत्सवाचा भव्य कार्यक्रम जिल्हा परिषद मैदान, गंगापूर येथे आयोजित करण्यात आला आहे. सलग ९ व्या वर्षी होणाऱ्या या उत्सवाचे नेतृत्व मा. नगराध्यक्ष संजय जाधव व आयोजन समितीच्या अध्यक्षा सौ. सुवर्णा संजय जाधव करत आहेत.उत्सवाची सुरुवात दि. २२ सप्टेंबर २०२५ रोजी, घटस्थापनेच्या दिवशी सायंकाळी ७ वाजता महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज पाटील यांच्या रसाळ कीर्तनाने होणार आहे. दि. २३ सप्टेंबर ते २९ सप्टेंबर दरम्यान ह.भ.प. भागवताचार्य बाळू महाराज गिरगावकर यांच्या सुश्राव्य वाणीतून देवी भागवत कथा आयोजित करण्यात आली आहे. दररोज कथा झाल्यानंतर फराळ प्रसादाचे वितरण करण्यात येणार आहे, अशी माहिती आयोजकांनी दिली.
या कार्यक्रमात विशेष आकर्षण ठरणार आहे दि. ३० सप्टेंबर रोजी होणारा “होम मिनिस्टर – खेळ खेळूया पैठणीचा” कार्यक्रम. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध निवेदक रमेश परळीकर करणार असून, महिलांसाठी असंख्य आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.प्रथम पारितोषिक – इलेक्ट्रिक स्कूटर, त्यानंतर वॉशिंग मशीन, फ्रीज, मिक्सर तसेच ३० आकर्षक पैठण्या आणि सहभागी महिलांना आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहेत.
दि. ०१ ऑक्टोबर रोजी ५० हून अधिक कलाकारांच्या सहभागासह डिजिटल धुमाकूळ हा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम रंगणार आहे. उत्सवाची सांगता दसऱ्याच्या दिवशी, भव्य शोभायात्रा/मिरवणुकीने होणार आहे. या मिरवणुकीत पारंपरिक वाद्यवृंद, देवीची सजवलेली मूर्ती आणि विविध सांस्कृतिक झांजांचा सहभाग असेल.या निमित्ताने आयोजिका सौ. सुवर्णा संजय जाधव यांनी गंगापूर तसेच पंचक्रोशीतील नागरिकांना आवाहन केले आहे की, “या भव्य धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांचा सर्वांनी लाभ घ्यावा व उत्सवाची शोभा वाढवावी.”