गांधीनगर, पित्तीनगर या रस्त्यावरील मोठ्या नाल्यांची साफसफाई करण्याची नागरीकांची मागणी
नाला सफाई न केल्यास नागरीकांच्या वतीने रस्ता रोको आंदोलनाचा ईशारा…
परिसरातील नागरीकांनी जिल्हाधिकारी व मनपा आयुक्त यांना दिले निवेदन..
जालना/ प्रतिनीधी / गांधीनगर, पित्तीनगर (कापुस जिनिंग) येथे मोठा नाला असून या नाल्याची दयनिय अवस्था झाली आहे.
नालाचं पाणी आता नागरिकांच्या घरात घुसत आहे. उकंडा पंधरा-पंधरा दिवस साफ होत नाही. त्यामुळं लहान लहान मुलं आजारी पडत आहेत. मात्र कुणी याकडे लक्ष देत नाही आहे. महानगरपालिकेत कुणाला विचारलं तर एकमेकांची नावे सांगून टोलवाटोलवी सुरु आहे. त्यामुळं आम्ही काय करावं हा प्रश्न आहे.
या नाल्यामध्ये मोठ्या प्रमाणात कचरा व घाण साचल्याने नाला पुर्णतः तुडूंब भरुन सर्वत्र घाण पसरली आहे. यामुळे परिसरामध्ये रोगराई पसरण्याची दाट शक्यता आहे. तसेच परिसरातील राहणाऱ्या लोकांच्या घरामध्ये या नाल्याचे घाण पाणी जाऊन याचा त्यांच्या आरोग्यवर घातक परिणाम होत आहे. सदरील नाला हा बऱ्याच वर्षांपासून साफ केलेला नाही. मागील वर्षी सुद्धा दि. 26-07-2024 मध्ये याबाबत अर्ज दिला होता. परंतु त्यावर अद्यापपर्यंत कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नसल्याचे निवेदन आज दि.14 बुधवार रोजी दुपारी दोन वा. च्या सुमारास परिसरातील नागरीकांनी जिल्हाधिकारी व मनपा आयुक्त यांना दिले.
दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले की, सदरील नाल्याची लवकरात लवकर साफ-सफाई करून व परिसरात स्वच्छता करून देण्यात यावी. तसेच यामुळे काही जिवीत हानी झाली तर त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील, याची नोंद घ्यावी. तसेच पुढील 5 दिवसात याबाबत काहीच कार्यवाही झाली नाही तर आम्ही रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल. काही वाद उद्भवल्यास त्याची, सर्वस्वी जबाबदारी आपल्यावर राहील, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
दिलेल्या निवेदनावर शहेबाज़ अंसारी, कय्युम तंबोली, शेख बाबा, इसहा तंबोली, सय्यद जावेद, नजी़र खान, सोहेल काझी, समीर बागवान, सोहेल बागवान, परवेज़ तंबोली, तारेख तंबोली यांच्यासह परिसरातील अनेक नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.