नैसर्गिक झऱ्यांची गणना; आपल्या भागातील झऱ्यांची
माहिती कळवा-भूजल सर्व्हेक्षण आणि विकास यंत्रणेचे आवाहन
छत्रपती संभाजीनगर – जल संसाधन, नदी विकास आणि गंगा संरक्षण मंत्रालयाच्या वतीने देशातील पहिली झऱ्यांची गणना सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या गणनेसाठी भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणाला नोडल एजन्सी म्हणून नियुक्त्त केले आहे.
दरम्यान जिल्ह्यात ही गणना दि.१५ पासून सुरु झाली असून नागरिकांनी आपापल्या भागातील झऱ्यांची माहिती कळवावी, असे आवाहन भूजल सर्व्हेक्षण आणि विकास यंत्रणेचे वरिष्ठ भूवैज्ञानिक जीवन बेडवाल यांनी केले आहे.
अशी होईल गणना
वरिष्ठ भूवैज्ञानिक बेडवाल यांनी माहिती दिली की, सन २०२३-२४ च्या कृषी वर्षाला संदर्भ वर्ष म्हणून मानून झऱ्यांची पहिली गणना केली जाईल. जिल्ह्यात ही गणना सुरु झाली असून ती आगामी वर्षभर (कृषी वर्ष) चालेल. ही गणना पूर्णपणे डिजिटल पद्धतीने केली जात आहे. मोबाईल अप्लिकेशनद्वारे डेटा संकलन आणि वेब अप्लिकेशनद्वारे डेटा प्रमाणीकरण आणि देखरेख केली जाणार आहे. गणनेच्या वेब अप्लिकेशनमध्ये रिअल टाइम प्रगती दर्शविणारा डॅशबोर्ड देखील समाविष्ट केला आहे. ग्रामीण आणि शहरी भागात अनुक्रमे गाव आणि वॉर्ड हे गणनेचे प्राथमिक क्षेत्र एकक असेल. जंगलात असलेले झरे जवळच्या गावात/वॉर्डमध्ये घेतले जातील. देशभरातील सर्व प्रशासकीय युनिट्सची यादी करण्यासाठी स्थानिक सरकारी निर्देशिका (LGD) कोड वापरुन जनगणना केली जात आहेत. प्रगणनासाठी तालुकास्तरावरील गट विकास अधिकारी, ग्राम स्तरावरील ग्राम सेवक, सरपंच, तलाठी, कोतवाल, शिक्षक यांना सहभागी करून गणनेचे कामे करण्यात येत आहेत.
झऱ्यांच्या गणनेची आवश्यकता
नीती आयोगाच्या कार्यगटाच्या अहवालानुसार, देशभरातील सुमारे २० कोटी लोक झऱ्याच्या पाण्यावर अवलंबून आहेत. प्रामुख्याने भारतीय हिमालयीन प्रदेश, पश्चिम घाट (सह्याद्री पर्वतरांगा, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू), पूर्व घाट (उत्तर ओडिशा, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू) आणि मध्य भारत (सत्पुरा आणि विंध्य पर्वत) या भागातील लोक. अहवालानुसार, भारतातील १५% पेक्षा जास्त लोकसंख्या त्यांच्या पाण्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी झऱ्यांच्या पाण्यावर अवलंबून आहे.
ही परिस्थिती विशेषतः पर्वतीय भागात, गावे/वस्त्या स्थानिक कड्यावर स्थित असतात तेथे असते. धोरणात्मक आणि सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पाहिल्यास, हे असे क्षेत्र आहेत जिथे नद्या खोल दऱ्यांमध्ये वाहतात आणि हिमनद्या पर्वतांमध्ये उंचावर असतात, म्हणून या दोन्ही स्रोतांमधून पाणी काढणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नसते. त्यामुळे या लोकांना झऱ्यांच्या पाण्यावर अवलंबून रहावे लागते.
अशा भागांमध्ये ग्रामीण समुदायांच्या पिण्याच्या, आणि घरगुती पाण्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी स्थानिक झरे हा एकमेव स्रोत आहे. या व्यतिरिक्त, हे झरे पावसाळ्यात अनेक नद्यांमध्ये वाहतात. झऱ्यांचे पाणी हेच नदीचे स्रोत असतात. भारतातील पर्वतीय प्रदेशांमध्ये, जेव्हा मोठ्या नद्या देखील पाणी पुरवण्यात अपयशी ठरतात, तेव्हा हे लहान जलस्रोत महत्त्वाची भूमिका बजावतात.
भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणाला नोडल एजन्सी
झऱ्याचे हे महत्त्व लक्षात घेता, २०१८ मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘जल सुरक्षेसाठी हिमालयातील झऱ्यांचे इन्व्हेंटरी अँड रिव्हायव्हल ऑफ वॉटर सिक्युरिटी’ या निती आयोगाच्या कार्य गट-१ द्वारे झऱ्यांची मॅपिंग प्रगणना आयोजित करण्याच्या गरजेवर जोर देण्यात आला आहे. त्यानुसार, देशाच्या पर्वतीय आणि डोगराळ भागांमध्ये जलसुरक्षा टिकवून ठेवण्यासाठी झऱ्यांचे महत्त्व लक्षात घेऊन, जल संसाधन, नदी विकास आणि गंगा संरक्षण मंत्रालयाने केंद्र पुरस्कृत देशातील पहिली झऱ्याची गणना सुरू करण्याचा निर्णय घेतला. झऱ्याची पहिली जनगणना करण्यासाठी भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणाला नोडल एजन्सी म्हणून नियुक्त्त केले आहे. देशात सद्यस्थितीत जलस्रोतांसाठी गणना सुरु आहेत. त्यात झऱ्यांची पहिली गणना, पाटबंधारे विभागामार्फत लघु प्रकल्पांची ७ व गणना, जलशयांची दुसरी गणना, मोठ्या व मध्यम प्रकल्पांची पहिली गणना होत आहे.
झऱ्यांची माहिती कळविण्याचे आवाहन
झरा म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागावर नैसर्गिकरित्या निर्माण होणाऱ्या भूजलाचा केंद्रित विसर्जन. सर्वसाधारणपणे झरे हे मुक्त प्रवाह किंवा गळणारे झरे म्हणून पाहिले जाऊ शकतात. एकेंद्रित प्रवाहाने वैशिष्ट्यीकृत मुक्त वाहणारे झरे व्यतिरिक्त, खडकांमधील पारगम्य गाळ किंवा फ्रॅक्चरमधून लहान आणि स्थानिक भूजल गळती होतात. ज्यामुळे स्थानिक भागात वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाणारे पाण्याचे तलाव तयार होतात. आपल्या भागात आसपास झरे असल्यास त्याची माहिती भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेस कळवावी. माहिती कळविण्यासाठी संपर्क क्रमांक. ८००७४०१४०८.
जिल्ह्यात आतापर्यंत आढळले १३ झरे
जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या गणनेत १३ झरे आढळून आले आहेत. त्यात सिल्लोड तालुक्यात २, फुलंब्री तालुक्यात १, खुलताबाद तालुक्यात ४, कन्नड तालुक्यात ६ झरे आढळून आले आहेत. अद्याप गणना सुरु आहे. ब्रिटीश राजवटीत संपूर्ण देशाच्या मोजणीचे आणि भुपृष्ठ नकाशे तयार करण्याचे काम १९१० मध्ये सुरु करण्यात आले होते. त्यावेळी काही झऱ्यांच्या नोंदी ह्या त्या नकाशांवर आहेत. कालौघात त्यातील काही झरे लुप्त होतात किंवा काही मार्ग बदलतात. त्याचीही तपासणी या गणनेत होईल, असे सहा. भुवैज्ञानिक डॉ. आहेर यांनी सांगितले.
झरा कशाला म्हणाल?
“पाण्याचा झरा” म्हणजे अशा जागेला म्हणतात जिथे भूजल नैसर्गिकरित्या पृष्ठभागावर वाहते. ते मूलतः भूगर्भातील पाण्याचे आउटलेट असते, जे बहुतेकदा नैसर्गिक विहीर किंवा ओढ्यासारखे दिसते. हेच भूजलाचे पृष्ठभागावरील प्रकटीकरण असलेले झरे हे पवर्तांमधून वाहत येत असतात,असे सहायक भूवैज्ञानिक डॉ. कैलास आहेर यांनी सांगितले.
