Tuesday, October 28, 2025
Homeऔरंगाबाद" त्या " कामाला आपल्याच कार्यकाळात मंजुरी : फुकटचे श्रेय लाटू नका

” त्या ” कामाला आपल्याच कार्यकाळात मंजुरी : फुकटचे श्रेय लाटू नका

त्या  कामाला आपल्याच कार्यकाळात मंजुरी : फुकटचे श्रेय लाटू नका

माजी आमदार कैलास गोरंटयाल यांचा प्रतिस्पर्ध्यांना टोला
जालना /प्रतिनीधी/ अंबड येथील ३५ एमएलडी जलशुद्धीकरण केंद्राच्या कामाला आपल्या कार्यकाळात सुमारे ७२ कोटींच्या निधिसह राज्य शासनाची मंजुरी मिळाली असून त्याच वेळी कामाला देखील सुरुवात करण्यात आली होती. त्यामुळे विद्यमान आमदारांनी आयत्या पिठावर रेघोट्या ओढून फुकटचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नये असा टोला जालन्याचे माजी आमदार कैलास गोरंटयाल यांनी लगावला आहे.
जालना शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी राज्यात काँग्रेस आघाडीची सत्ता असतांना आपण जायकवाडी – जालना पाणी पुरवठा योजनेचा प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर केला होता आणि सदर प्रस्तावास मंजुरी मिळवून घेतली होती याची आठवण करून देत गोरंटयाल म्हणाले की, या प्रस्तावित योजनेच्या कामात देखील अनेक अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न आपल्या विरोधकांनी केला होता.मात्र, या सर्व अडथळ्यांवर मात करून आपण योजनेचे काम तडीस लावले आणि या योजनेद्वारे जालना शहरातील जनतेला पाणी पुरवठा करण्याचा आपला संकल्प पूर्ण केला. या योजनेचे अंदाजपत्रक तयार करतांना प्रशासकीय पातळीवरून अंबड येथील जलशुद्धीकरण केंद्रात पाणी शुद्ध करण्याची क्षमता चुकून १५ एमएलडी इतकी ठेवण्यात आली. त्यामुळे या ठिकाणी आणखी ३५ एमएलडी इतकी क्षमता असलेले जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यासाठी मंजुरी मिळावी तसेच राष्ट्रसंत गाडगे बाबा जलाशय (घानेवाडी) ते जेईएस महाविद्यालयाच्या पाठीमागे असलेल्या जुन्या एमआयडीसी भागातील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत या जीर्ण झालेल्या जलवाहिनीचे नव्याने काम करण्यासाठी आपण राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी पत्रव्यवहार करून त्या बाबत विधिमंडळाच्या अधिवेशनात देखील वारंवार पाठपुरावा केला होता.त्यामुळेच आपल्या आमदारकीच्या कार्यकाळात उपरोक्त दोन्हीही कामांना मंजुरी देत राज्य सरकारने त्यासाठी सुमारे ७२ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केल्याचे सांगून त्यानंतर या कामाला आपल्याच कार्यकाळात सुरुवात झाली होती असे असतांनाही विद्यमान आमदार आपण मंजूर करून आणलेल्या व आपल्याच कार्यकाळात सुरू झालेल्या विकास कामांचे फुकटचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका माजी आमदार कैलास गोरंटयाल यांनी केली आहे.आपण मंजूर करून आणलेल्या विकास कामांचे श्रेय लाटण्याऐवजी राज्यात सत्तेत असलेल्या या महाशयांनी शहराच्या विकासात भर पडेल असे काही तरी भरीव काम करून दाखवावे असे आव्हान गोरंटयाल यांनी दिले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments