इतर मागास संवर्गातील समूहांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध – इमाव बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे
छत्रपती संभाजीनगर – इतर मागास संवर्गात अनेक जातींचा समावेश आहे. या सर्व समुहाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी इतर मागास वर्ग बहुजन कल्याण मंत्रालय कटिबद्ध आहे. विविध महामंडळांच्या शैक्षणिक व आर्थिक विकासाच्या योजनांच्या माध्यमातून हा विकास करण्यात येत आहे,असे प्रतिपादन राज्याचे इतर मागास वर्ग बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी आज येथे केले.
इतर मागासवर्ग व बहुजन कल्याण विभागाच्या वतीने महात्मा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात ‘महाज्योती’च्या वतीने आज कर्ज वाटप व स्वयंरोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. न्यू तिरुमला मंगल कार्यालय, पुंडलिकनगर रोड, गारखेडा परिसर येथे हा मेळावा पार पडला.
राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. राज्यसभा सदस्य खा. डॉ. भागवत कराड, खा. डॉ. अजित गोपचडे, आ. अनुराधा चव्हाण, देवगिरी बॅंकेचे अध्यक्ष किशोर शितोळे, महाराष्ट्र राज्य इतर मागास वर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रविंद्र पेटकर, महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक मिलिंद नारिंगे, वसंतराव नाईक महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रताप पवार तसेच अन्य मान्यवर या मेळाव्यास उपस्थित होते.
या मेळाव्यात इमाव महामंडळातर्फे ६६ थेट कर्ज, वसंतराव नाईक भटक्या विमुक्त जाती जमाती महामंडळातर्फे ११४ जणांना थेट कर्ज, तर ७५ जणांना वैयक्तिक कर्ज परतावा, इमाव महामंडळातर्फे २१० जणांना कर्ज परतावा, तर ३०० जणांना ‘महाज्योती’मार्फत कर्ज परतावा लाभ देण्यात आला. प्रातिनिधीक स्वरुपात लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते लाभ वितरण करण्यात आले.
इमाव बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे म्हणाले की, शासनाच्या अंगीकृत महामंडळांमार्फत प्रत्येकाला रोजगार, स्वयंरोजगारासाठी सहाय्य केले जाते. याशिवाय शिक्षण घेता यावे यासाठी प्रत्येक टप्प्यावर शिष्यवृत्ती, स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन आदी केले जाते. त्याचे चांगले परिणाम दिसून येत आहेत. नुकत्याच झालेल्या राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत महाज्योतीच्या विद्यार्थ्यांनी चांगले यश संपादन केले आहे. ही बाब उत्साह वाढविणारी आहे. अर्थसहाय्य, कर्ज उपलब्धतेसाठी शासनाने अनेक अटी रद्द केल्या तसेच कर्ज मर्यादाही वाढविल्या आहेत. तसेच महामंडळांचे भागभांडवल वाढवून शासनाने अधिकाधिक लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी सक्रिय पुढाकार घेतला आहे. ओबीसी समूहातील सर्व जातीच्या गटांनी या योजनांचा लाभ घ्यावा व आपला शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक उत्कर्ष साधावा,असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
आ. अनुराधा चव्हाण, खा. डॉ. भागवत कराड, खा. डॉ. अजित गोपचडे यांनीही यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले. इतर मागास वर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रविंद्र पेटकर यांनी प्रास्ताविक केले. या मेळाव्यास छत्रपती संभाजीनगर विभागातील लाभार्थी उपस्थित होते.
