डॉ संपदा मुंडे प्रकरणात दोषींवर कठोर कार्यवाही करा.. केज येथे झाला रस्ता रोको
केज/प्रतिनिधी/ वैद्यकीय अधिकारी डॉ संपदा मुंडेंची आत्महत्या ही नीतिमूल्ये हरवलेल्या प्रशासकीय व्यवस्थेचे प्रदर्शन असून सामान्य कुटुंबातील या उच्च शिक्षित डॉक्टर तरुणीची आत्महत्या समाजाला चिंतेत टाकणारी व भयभीत करणारी आहे. डॉ संपदाच्या आत्महत्येस कारणीभूत असणाऱ्या पोलिस अधिकारी, राजकीय लोकप्रतिनिधी व इतर संबंधितावर गुन्हे दाखल करून कठोर कार्यवाही करा या मागणीसाठी शनिवारी सकाळी केज येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात केज विकास संघर्ष समिती, शेकाप व इतर सामाजिक संघटनांच्या वतीने रस्ता करण्यात आला.
डॉ संपदा मुंडे या फलटण येथे उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी mhanun कार्यरत होत्या. याठिकाणी त्यांना आरोपीच्या फिटनेस प्रमाणपत्रावरून पोलिस अधिकारी, खासदार लोकप्रतिनिधी व इतर लोकांकडून प्रचंड दबाव टाकला जात होता. यासाठी त्यांचा लैंगिक, मानसिक व शारीरिक छळ केला जात असल्याचे त्यांनी नमूद केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. यावरून सध्या सर्वच क्षेत्रात सेवा करणाऱ्या महिलांच्या समस्या आल्या आहेत.
सध्या वैद्यकीय डॉक्टर बनून बहुतांश तरुण तरुणी मोठ्या शहरात मोठी हॉस्पिटल उभी करून सेवा देतात. मात्र डॉ संपदा ही सामान्य कुटुंबातील मुलगी होती. एमबीबीएस सारख्या क्षेत्रात उच्च शिक्षण घेऊनही ती फलटण सारख्या ग्रामीण भागात वैद्यकीय अधिकारी म्हणून गरीब जनतेची सेवा करत होती. ती श्रीमंतांची लेक असती तर तिने पुढील शिक्षण घेऊन मोठे हॉस्पिटल टाकले असते.
ती महाराष्ट्रातील सामान्य व गरीब कुटुंबाची प्रतिनिधी होती. डॉ संपदा ने वरिष्ठांना आपल्याला होत असलेल्या त्रासाबद्दल कळवले होते. त्याचवेळी तिच्या तक्रारीची दखल घेतली असती तर कदाचित तिचा जीव वाचला असता.
ही घटना अत्यंत गंभीर व तितकीच अस्वस्थ व चिंतेत टाकणारी आहे. या घटनेतील सर्व दोषी लोकांवर चौकशी करून कार्यवाही करावी व दोषींना कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी यावेळी आंदोलकांच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते हनुमंत भोसले, भाई मोहन गुंड, महेश जाजू, नासेर मुंडे व इतर नागरिकांच्या वतीने करण्यात आले. केज पोलिसांनी आंदोलनकर्त्याच्या वतीने निवेदन स्वीकारले.