धम्मदीप बुद्ध विहारात चैत्र पौर्णिमा उत्साहात साजरी
बीड/प्रतिनिधी/ बौद्ध धम्मात प्रत्येक पौर्णिमेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. अनेक महत्त्वपूर्ण घटना तथागतांच्या जीवनात पौर्णिमेलाच घडल्या आहेत. खडतर तपश्चर्या करूनही सिद्धार्थला दुःख मुक्तीचा मार्ग सापडला नाही. शरीर अस्थिपंजर झाले होते, त्यानंतर ते उरूवेलेला वटवृक्षाखाली घ्यानस्थ बसले असता सुजाता नावाच्या राजकन्यांनी त्यांना ह्याच चैत्र पौर्णिमेला तिची मनोकामना पूर्ण झाल्यामुळे सिद्धार्थला वनदेवता समजून खीर प्राशन करायची विनंती केली होती. त्या विनंतीनुसार सिद्धार्थाने खीर प्राशन केल्यानंतर त्राण प्राप्त झाले व पुढे गयेला पिंपळवृक्षाखाली ध्यानधारणा केल्यानंतर वैशाख पौर्णिमेला दिव्य ज्ञान प्राप्त झाले. तरी प्रत्येकाने तथागतानी सांगितलेल्या मार्गाचा जीवन जगण्याकरिता ध्यानधारणा, विपश्यना करणे, आपले मन जे राग, लोभ,द्वेष, अशांततेने भरले आहे ते शांती, प्रेम, मैत्री, करूणा दान करण्यास सतत प्रवृत्त राहील व आपल्या जीवनात तसे आचरण ठेवणे किती गरजेचे आहे व माणसाचा चेहरा हा अंतर्मनाचा आरसा आहे तरी अंतरमनात राग, लोभ, द्वेष, अशांततेची धूळ बसू न देता त्रिशरण, पंचशील, अष्टांगिकमार्ग व दहा प पारमितींचे केवळ बुद्धविहारात जाऊन सामुदायिक वाचन न करता ते आपल्या जीवनात आचरण करून तथागताने सांगितलेल्या दुःखमुक्तीच्या मार्गावर चालण्याकरिता सतत प्रयत्नशील असले पाहिजे. ह्यातच सर्व मानव जातीचे कल्याण आहे असे तथागतच्या जीवनातील अनेक प्रसंग सांगून धम्मदीप बुद्ध विहारात चैत्र पौर्णिमा निमित्त आयोजित वंदना प्रसंगी प्रशांत वासनिक यांनी प्रतिपादन केले.
सर्वप्रथम तथागतास पुष्प व महामानवांच्या प्रतिमांना पुष्यमाला अर्पण करून दीप प्रज्वलीत करून सामुदायिक वंदना घेण्यात आली. या कार्यक्रम प्रसंगी प्रशांत वासनीक व सुजाता वासनीक या दांपत्याने इगतपुरी येथे दहा दिवसीय विपशना शिबिर करून आल्याबद्दल धम्मदीप बुद्ध विहार, महामानव अभिवादन ग्रुप बीड व वाचाल तर वाचाल वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने त्यांचा पुष्पगुच्छ भिमाई, भारतीयांचा राष्ट्रीय धर्म व नवी पहाट हा काव्यसंग्रह पुस्तक देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त एलआयसी प्रबंधक यु.एस. वाघमारे तर प्रमुख पाहुणे म्हणून बौद्धाचार्य तथा समता सैनिक दलाचे मेजर जनरल कॅप्टन राजाभाऊ आठवले लाभले होते. विचार मंचावर महामानव अभिवादन ग्रुपचे अध्यक्ष जी.एम. भोले, एस.एस. सोनवणे सेवानिवृत्त पीएसआय तानाजी शिनगारे, अरुण वाघमारे,उमेश चांदणे यांची प्रमुख उपस्थिती होती. उमेश चांदणे परिवारातर्फे देखील वासनिक दांपत्याचा शाल, पुष्पगुच्छ व तथागताची फोटो फ्रेम देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अँड.तेजस वडमारे यांनी तर प्रस्ताविक डि.जी वानखेडे यांनी केले.
याप्रसंगी सुजाता वासनिक यांनी विपश्यनेचे महत्त्व व जीवनात होणारे बदल याविषयी स्व: अनुभव सांगितले. अध्यक्षीय समारोपात यु.एस.वाघमारे यांनी दर पौर्णिमा साजरी करणे, दर रविवार बुद्ध विहारात जाऊन धम्मा बद्दल माहिती करून घेणे तसेच जीवनात विपश्यनेचे महत्त्व अनेक उदाहरणाद्वारे समजावून सांगितले. कार्यक्रमास अंजली वडमारे, सरिता खेमाडे, अर्चना जाधव, आशाबाई भालेराव, क्रांती धनवे, मालन अंकुटे, रमाबाई सोनवणे रंजना चांदणे , सुशीला वक्ते, संस्कार,सुदर्शन चांदणे, सुमेध वक्ते,महामान अभिवाद ग्रुपचे सदस्य व धम्मदीप बुद्ध विहार महिला मंडळाच्या बहुसंख्य महिला, बालक, बालिका यांची उपस्थिती होती. अंजली वडमारे यांच्यातर्फे खीर दान करण्यात आले व शरणातयेणे कार्यक्रमाची सांगता झाली.