दाढेगावच्या विद्यार्थ्यांनीही जपले समाजभान
पूरग्रस्त बांधवांसाठी स्वयंस्फूर्त मदत उपक्रमाने दिला संवेदनशीलतेचा संदेश
घनसावंगी/प्रतिनिधी/ अतिवृष्टी आणि नदीला आलेल्या पुरामुळे घनसावंगी, अंबड, आणि परिसरातील गोदाकाठच्या अनेक गावांतील नागरिकांच्या आयुष्यावर संकट कोसळले आहे. घरात पाणी शिरल्याने संसारोपयोगी साहित्य, धान्य, जनावरे, तसेच शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अनेक कुटुंबे विस्थापित झाली असून, नागरिकांना पुन्हा उभं राहण्यासाठी विविध संस्था, संघटना, आणि समाजभान जागृत नागरिक पुढे सरसावत आहेत.
या संकटाच्या काळात दाढेगाव येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी केलेले कार्य हे समाजातील प्रत्येकाने अनुकरण करण्यासारखे आहे. लहान वयातच समाजातील दुःख जाणणाऱ्या या विद्यार्थ्यांनी स्वतःहून पुढाकार घेत पूरग्रस्त बांधवांसाठी मदत निधी गोळा केला. विद्यार्थ्यांनी जमवलेल्या एकूण रुपये १,३७० ची रक्कम शालेय समिती अध्यक्ष राजू काकडे, ग्रामपंचायत सदस्य दत्ता शेंडगे, लहू लेंभे, मुख्याध्यापिका श्रीमती मंगल बारगजे, शिक्षक श्री शिवाजी बांगर, श्रीमती ज्योती दराडे, श्री ओंकार आकुसकर, श्रीमती प्रतिभा ज्योतिक, आणि कु. भाग्यश्री देवडे यांच्या उपस्थितीत ‘समाजभान’ संस्थेचे प्रतिनिधी श्री सोपान पाष्टे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.
शाळेच्या विद्यार्थ्यांप्रमाणेच शिक्षकांनीही आपले योगदान देत संवेदनशीलतेचे दर्शन घडवले. शाळेच्या मुख्याध्यापिका मंगल बारगजे मॅडम यांनी ₹१,०००, शिक्षक शिवाजी बांगर सर यांनी ₹१,५००, ज्योती दराडे मॅडम यांनी ₹१,०००, ओंकार आकुसकर यांनी ₹५०१, तसेच भाग्यश्री देवडे मॅडम यांनी ₹५०१ इतकी रक्कम देऊन पूरग्रस्तांच्या दिवाळीला आनंद देण्याचा प्रयत्न केला.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण झाली असून, ‘इतरांच्या मदतीसाठी छोटासा हातभारही मोठा फरक घडवू शकतो’ हा संदेश त्यातून स्पष्ट झाला. दाढेगाव शाळेच्या या कार्याचे स्थानिक नागरिक, पालकवर्ग आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी मनःपूर्वक कौतुक केले आहे.