दारूच्या बिलावरून पोलिसाचा हॉटेलमध्ये धुमाकूळ; चाकू हल्ल्यात चौघे जखमी
हॉटेल मालक व कर्मचाऱ्यावर वार; पोलिस कर्मचाऱ्यासह चौघांवर गुन्हा दाखल..
आत्ताच एक्सप्रेस
संभाजीनगर /प्रतिनिधी/ धुळे सोलापूर महामार्गवरील पिंपळगाव (पांढरी) परिसरातील हॉटेल कार्तिक मध्ये जेवणाच्या व दारूच्या बिलावरून झालेल्या वादातून पोलिस कर्मचाऱ्याने हॉटेल मालक व कर्मचाऱ्यावर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेत हॉटेल मालकासह चौघेजण जखमी झाले असून संबंधित पोलिस कर्मचाऱ्यासह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित पोलिस कर्मचारी नितेश जाधव धुलिवंदनाच्या दिवशी दुपारी तीन वाजेच्या सुमारास मित्रांसह हॉटेलमध्ये जेवण व मद्यपानासाठी आला होता. बिलाच्या रकमेवरून वाद निर्माण झाला. बिल जास्त लावल्याचा आरोप करत त्याने हॉटेल कर्मचाऱ्यांशी वाद घातला. वादाचे रूपांतर मारहाणीमध्ये होऊन परिस्थिती चिघळली.
संतापाच्या भरात पोलिस कर्मचाऱ्याने चाकूने हॉटेल मालक व कर्मचाऱ्यावर वार केल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. यात दोघे गंभीर जखमी झाले, तर भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या अन्य दोघांना दुखापत झाली. जखमींवर एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनेनंतर स्थानिक करमाड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी राजपूत यांच्या पोलीस टिमने तत्काळ हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संबंधित पोलिस कर्मचाऱ्यासह त्याच्या तीन साथीदारांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून विभागीय कारवाईचे संकेत दिले आहेत.
या घटनेमुळे पोलिस दलाच्या प्रतिमेला धक्का बसल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. कायद्याचे रक्षण करणाऱ्या व्यक्तीकडूनच अशा प्रकारचे कृत्य घडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वसुदेव सूर्यवंशी, नाना सूर्यवंशी, शुभम सूर्यवंशी, शिवाजी काल्होरे या जखमींचे जबाब नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असून घटनेतील चाकू जप्त करण्यात आला आहे. संबंधित पोलिस कर्मचाऱ्याची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली आहे.
दरम्यान, हॉटेल परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून घटनेचा नेमका क्रम उलगडण्याचे काम सुरू आहे. चौघांविरुद्ध मारहाण, जीवे मारण्याचा प्रयत्न आणि सार्वजनिक शांतता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास करमाड पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस अधिकारी राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्री. तडवी व नागलोत करत आहे.