गंगापुरात दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर जयंतीकडे शासकीय कार्यालयांचे दुर्लक्ष भारतीय बहुउद्देशीय पत्रकार संघाकडून मुख्यमंत्र्यांना तक्रार अर्ज
आत्ताच एक्सप्रेस
गंगापूर/प्रतिनिधी/ मराठी पत्रकारितेचे जनक मानल्या जाणाऱ्या दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीकडे गंगापूर शहरातील विविध शासकीय कार्यालयांनी पूर्णतः दुर्लक्ष केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी भारतीय बहुउद्देशीय पत्रकार संघाच्या वतीने मुख्यमंत्री कार्यालयाकडे लेखी तक्रार अर्जाद्वारे केली आहे.
दिनांक २० फेब्रुवारी रोजी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती असते. शासनाच्या आदेशानुसार सर्व शासकीय कार्यालयात राष्ट्रपुरुषांच्या जयंती साजऱ्या करणे बंधनकारक आहे. मात्र गंगापूर शहरातील तहसील कार्यालय, तालुका कृषी कार्यालय, भूमी अभिलेख कार्यालय, दुय्यम निबंधक कार्यालय, जायकवाडी प्रकल्प कार्यालय, नगर परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, गटशिक्षण अधिकारी कार्यालय, विद्युत वितरण कार्यालय, पशुवैद्यकीय कार्यालय तसेच बस आगार कार्यालयात बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी करण्यात आलेली नसल्याचे तक्रार अर्जात नमूद करण्यात आले आहे.ही बाब महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९ तसेच शासन परिपत्रकांचे उल्लंघन करणारी असून संबंधित कार्यालय प्रमुखांकडून कर्तव्यात कसूर झाल्याचा आरोप पत्रकार संघाने केला आहे. या दुर्लक्षामुळे तालुक्यातील पत्रकारांच्या भावना दुखावल्या गेल्या असून शासन आदेशांची पायमल्ली झाल्याची भावना निर्माण झाल्याचेही अर्जात नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी संबंधित कार्यालय प्रमुखांची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करावी, तसेच पुढील वर्षांपासून सर्व शासकीय कार्यालयांत दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती नियमितपणे साजरी करण्याचे स्पष्ट आदेश द्यावेत, अशी मागणी संघाचे राज्याध्यक्ष विजय धोंडोंपंत बन्सोड, प्रदेश सचिव अय्युब पटेल, तालुका अध्यक्ष बाळासाहेब वाघमारे,सचीव लक्ष्मण माघाडे, प्रसिध्दीप्रमुख विशाल जोशी यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी केली आहे. यावेळी पत्रकार इब्राहिम शेख, गिरीश गंगापुरकर, महंमद तांबोळी, प्रकाश सातपुते, गणेश म्हैसमाळे, अमोल आळंजकर, राम पाटील, बाबुराव नरवडे, गणेश साळुंके आदी उपस्थित होते. तक्रार अर्जाची प्रत विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार तसेच गंगापूर तालुक्यातील सर्व संबंधित कार्यालय प्रमुखांना पाठविण्यात आली आहे.