औद्योगिक शिक्षण मंडळाच्या कॉलेज ऑफ कॉमर्स, सायन्स अँड इन्फोर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
पिंपरी : औद्योगिक शिक्षण मंडळाच्या कॉलेज ऑफ कॉमर्स, सायन्स अँड इन्फोर्मेशन टेक्नॉलॉजी, पिंपरी येथे २१ जून २०२५ रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रसिद्ध योगतज्ञ श्री. हिरामण भुजबळ यांची विशेष उपस्थिती लाभली होती.
कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ललित कानोरे यांच्या प्रास्ताविकाने झाली. त्यांनी आपल्या भाषणातून योगदिन साजरा करण्यामागील उद्दिष्ट स्पष्ट करताना सांगितले की, “योग ही केवळ शारीरिक व्यायामाची पद्धत नसून ती मन, शरीर व आत्मा यांच्यात संतुलन साधणारी शास्त्रीय पद्धती आहे. नियमित योगाभ्यास केल्यास शरीर तंदुरुस्त राहते आणि मानसिक स्वास्थ्यही सुधारते.”
यानंतर श्री. भुजबळ यांनी उपस्थित शिक्षक व विद्यार्थ्यांना अष्टांग योग म्हणजे काय, याची सविस्तर माहिती दिली. त्यांनी प्राणायाम, आसने व ध्यान यांचे महत्त्व समजावून सांगत सर्व उपस्थितांच्या सहभागाने योगासनांची प्रात्यक्षिके करून घेतली. विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत योगासने केली.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. अमृता जोशी यांनी अत्यंत प्रभावीपणे केले. प्रा. सावित्री मांढरे व प्रा. स्वाती मोरे यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे उत्कृष्ट संयोजन केले. कार्यक्रमाला वाणिज्य शाखेच्या उपप्राचार्य प्रा. सरिता गोयल व विज्ञान शाखेचे उपप्राचार्य डॉ. चंद्रशेखर सोनवणे यांचीही उपस्थिती लाभली होती.