चित्तोडा ग्रामपंचायत सरपंचांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत उपसरपंच-सदस्यांचा राजीनामा
जालना / प्रतिनिधी / बदनापूर तालुक्यातील चित्तोडा ग्रामपंचायत मध्ये आता नव्या वादाला तोंड फुटले आहे. या ग्रामपंचायतीमधील सरपंच, उपसरपंच व सदस्य यांच्यात धुसफूस सुरू होती. त्यानंतर आता थेट चित्तोडा ग्रामपंचायतचे सरपंच सुभाष डिघे यांच्यावर मनमानी कारभाराचा व भ्रष्टाचाराचे आरोप करीत उपसरपंचांसह सदस्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा देणारे दोन्ही सदस्य ह्या महिला असल्याने जिल्ह्यात चर्चेला उधाण आले आहे.
चित्तोडा ग्रामपंचायतचे सरपंच सुभाष डिघे यांचा मनमानी कारभार सुरू असल्याचा आरोप करण्यात येत आहे. मासिक बैठकीस न बोलावणे, ठरावादरम्यान विश्वासात न घेणे, बोगस सह्या करणे असे गंभीर आरोप उपसरपंच सखुबाई संजय डिघे पाटील यांनी केले आहेत. महत्त्वाचे म्हणजे आपण महिला असल्या कारणाने पुरूष सरपंच नेहेमीच तिरस्कार करत असल्याचा गंभीर आरोपही माध्यमांशी बोलतांना सखुबाई डिघे यांनी केला आहे. सदस्य रंजनाबाई बाबासाहेब डिघे पाटील यांनीही सदस्य पदाचा राजीनामा दिला असून त्यांनीही सरपंचांवर गंभीर आरोप केले आहेत.
बदनापूर तालुक्यातील चित्तोडा ग्रामपंचायतीत एकूण सात सदस्य आहेत. जात पडताळणीमुळे तीन पदे रिक्त होती. उर्वरित चार पैकी दोन म्हणजे उपसरपंच सखुबाई डिघे व सदस्य रंजनाबाई डिघे यांनी बदनापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे रितसर राजीनामा दाखल केला असल्याने आता या ग्रामपंचायतीत केवळ दोन सदस्य राहिले आहेत.


