चालुक्यकालीन येरगी येथे जागतिक वारसा दिनानिमित्त हेरिटेज वॉक आणि भरत नाट्यमचे सादरीकरण
देगलूर : जागतिक वारसा दिनाच्या निमित्ताने जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांच्या संकल्पनेतून सहाय्यक संचालक (पुरातत्त्व) नांदेड विभाग, ग्रामपंचायत येरगी व जिल्हा प्रशासन, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने हेरिटेज वॉक आणि भरत नाट्यमचे सादरीकरण येरगी येथे आयोजित करण्यात आले होते. येरगी गावातील पुरातत्वीय व ऐतिहासिक वारसा, कला, संस्कृती यांची जोपासना करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. येरगीचे सरपंच संतोष पाटील व गावकऱ्यांनी पहाटे ४ पासूनच संपुर्ण गावातील रस्ते स्वच्छ करून त्यावर सुरेख रांगोळी काढल्या .सकाळी ७ वाजता महाराष्टातील पारंपरिक वेशभूषेत पुरूषांनी धोती व महिलांनी नऊवारी साडी घालून येरगी येथे आगमन झालेल्या भरत नाट्यमय टिमचे स्वागत पारंपरिक पद्धतीने ओवाळून केला. गावात सुरूवातीला भजनी मंडळी, त्यांच्या पाठीमागे शाळेतील मुला – मुलींचे लेझीमचे पथक, त्यांच्या मागे भरत नाट्यम करणाऱ्या मुली यांचे पथक होते.
गावातील बालीका पंचायत राजच्या मुली व हातामध्ये आरतीचे ताटे घेऊन पारंपरिक वेशभूषेत असलेल्या स्त्रीया होत्या. आपल्या वारसाबद्दलच्या या जनजागृती कार्यक्रमाला गावकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
मारोती मंदिर, महादेव मंदिर, सरस्वती मंदिरासमोर दिप्ती उबाळे यांच्या मार्गदर्शनखाली भरत नाट्यम चमुने शिवस्तुती गुरुस्तुती, सरस्वती वंदना,सरस्वती कौतुकम – जय शारदे वागेश्वरी,शंकराचार्य स्तुति – जय जय शंकर हर हर शंकर,
पुष्पांजली,शिवतांडव,अलरीपू,
देवी स्तुती – महिषासुरमर्दिनी इत्यादी गाण्यांचे सादरीकरण केले.
भरतनाट्यम ग्रुपचा व नंदगिरी किल्याचे किल्लेदार यांचा बालिका पंचायत राज समितीच्या सदस्यांनी सत्कार केला.
यावेळी पुरातत्त्व विभागाचे समन्वयक डॉ. कामाजी डक, नांदेड इंटकचे सुरेश जोंधळे,वास्तुविशारद कासार पाटील,नायब तहसीलदार मकरंद दिवाकर,कलाशिक्षक गजानन सुरकुटवार, ग्रामविकास अधिकारी राजेश तोटावाड ,तलाठी ऋषिकेश म्हेत्रे व नंदगिरीचे किल्लेदार पोलिस उपनिरीक्षक राजेश डाकेवाड,ग्राम पंचायत सदस्य, तंटामुक्ती अध्यक्ष, पोलिस पाटील, शाळेतील शिक्षक,शालेय समितीचे अध्यक्ष तथा गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी झाले होते.
ऐतिहासिक व पुरातत्वीय दृष्ट्रीने महत्वाचे असलेले येरगी या गावात चालुक्यांची एकूण 5 शिलालेख व चार मंदिराची अवशेष आहेत. तसेच बरीच शिल्प आहेत. शिलालेखात आलेल्या उल्लेखावरुन येरगी प्राचीन काळी या परिसरातील प्रसिद्ध शैक्षणिक केंद्र असल्याचे दिसून येते. त्याचप्रमाणे येरगीचा मूलस्थान असा केलेला उल्लेख हे स्थान महत्त्वाचे किंवा पवित्र असल्याचे दर्शविते. येरगीला स्थानिंक लोकांनी चालविलेली शाळा किंवा घटिकास्थानही होते. येरगी या ठिकाणी शैक्षणिक केंद्राप्रमाणे त्रैपुरूषदेव (ब्रह्मा, विष्णु व महेश) मंदिर बांधण्यात आले होते असा उल्लेख होट्टल येथील शिलालेखात आढळतो. याशिवाय शिलालेखात उल्लेखिल्याप्रमाणे येथे केशवदेव व नागेश्वर यांचीही देवालये होती. याच गावात द्वारशाखेवर नव्याने आढळून आलेल्या शिलालेखात देखील केशवेश्वर मंदिराचा उल्लेख आला आहे.