विद्यार्थ्यांच्या चिंताजनक आत्महत्या
अलिकडल्या काळात विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या घटनांत प्रचंड वाढ झाली आहे. दररोजच्या वर्तमानपत्रात शालेय किंवा महाविद्यालयीन विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची एखादी तरी बातमी असतेच. विद्यार्थी आत्महत्यांच्या वाढत्या घटनेबाबत सर्वत्र चिंता व्यक्त केली जात आहे. भारतातील विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांबाबत भारतातच नव्हे तर जगभर चिंता व्यक्त होत आहे. मागील वर्षी भारतातील विद्यार्थ्यांच्या वाढत्या आत्महत्यांबाबत एक अहवाल प्रसिद्ध झाला होता. नॅशनल क्राईम ब्युरोच्या डेटावर आधारित स्टुडंट्स सुसाईड : अन अपेडेमिक स्वीपिंग इंडिया नावाचा अहवाल वार्षिक आयसी ३ परिषद आणि आणि एक्स्पो २०२४ मध्ये जाहीर करण्यात आला होता. हा अहवाल अतिशय धक्कादायक आहे कारण या अहवालात आपल्या देशातील आत्महत्यांचे वास्तव मांडण्यात आले आहे. या अहवालानुसार देशातील आत्महत्यांच्या दरात कमालीची वाढ झाली आहे. दरवर्षी देशभरात ७० हजारांहून अधिक नागरिक आत्महत्या करत असून यात सर्वात जास्त आत्महत्या पुरोगामी महाराष्ट्रात होत आहेत. त्यातही धक्कादायक आणि चिंताजनक बाब म्हणजे यात सर्वाधिक आत्महत्या विद्यार्थ्यांच्या आहेत. त्यातही पुरोगामी महाराष्ट्राचा पहिला क्रमांक लागतो. महाराष्ट्रात सर्वाधिक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. महाराष्ट्रानंतर तामिळनाडू, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, झारखंड या राज्याचा क्रमांक लागतो. विद्यार्थी आत्महत्येत महाराष्ट्र अव्वल क्रमांकावर असणे ही भूषणावह बाब नसून शिव, फुले, शाहू, आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्राला खाली मान घालायला लावणारी ही बाब आहे. कणखर देशा राकट देशा दगडांच्या देशा असा महाराष्ट्राचा उल्लेख होतो त्यात दुर्दैवाने आत्महत्यांच्या देशा असेही नमूद करावे लागत आहे. आज जगातील सर्वाधिक लोकसंख्या भारतात आहे आणि यात सर्वात जास्त तरुणांची संख्या आहे. भारतात तरुणांची संख्या जवळपास ६० टक्के इतकी आहे. इतके तरुण जगातील कोणत्याच देशात नाहीत म्हणूनच भारताकडे आगामी महासत्ता म्हणून पहिले जाते. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांचा तर तरुणांवर खूप विश्वास होता. तरुणांच्या जोरावरच भारत जागतिक महासत्ता बनेल असा विश्र्वास त्यांना होता. ज्या तरुणांच्या जोरावर आपण महासत्ता बनण्याची स्वप्ने पाहत आहोत तोच तरुण जर असा अकाली मृत्यूला कवटाळू लागला तर देशाच्या भविष्यावरच प्रश्न चिन्ह निर्माण होऊ शकते म्हणूनच विद्यार्थ्यांच्या या आत्महत्या राज्यकर्त्यांनी गांभीर्याने घ्याव्यात आणि आत्महत्या कमी रोखण्यासाठी ठोस धोरण आखायला हवे. अर्थात विद्यार्थी आत्महत्या का करतात याचाही विचार व्हायला हवा. विद्यार्थ्यांच्या वाढत्या आत्महत्यांमागे अनेक करणे आहेत त्यातील प्रमुख कारण म्हणजे पालकांच्या मुलांकडून अनाठायी अपेक्षा. शिक्षणातील भयंकर स्पर्धा, गुणांची जीवघेणी चढाओढ, शिक्षण घेऊनही रोजगार न मिळणे, प्रेमभंग या आणि अशा अनेक कारणांमुळे तरुण अकाली मृत्यूला कवटाळीत आहेत. समाज माध्यमांचा वाढता प्रभाव हे देखील विद्यार्थी आत्महत्यांच्या कारणांपैकी महत्वाचे कारण आहे. समाज माध्यमांच्या आहारी गेल्यामुळे मुले खूप भावनिक झाली आहे. आपल्या भावनांना आवर न घालता आल्याने मुले आत्महत्येचा मार्ग स्वीकारीत आहेत. ब्लू व्हेल, पोकोमन यासारख्या हिंसक गेम्समुळे देखील अनेक मुलांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. विद्यार्थ्यांना पालकांकडून हल्ली अनेक गोष्टी सहज उपलब्ध होऊ लागल्या आहेत त्यामुळे एखादी गोष्ट जेंव्हा मिळत नाही तेंव्हा ती मिळावी यासाठी विद्यार्थी अट्टाहास करतात मग त्यांना त्यात अप्याश आले की ते मृत्यूला कवटाळतात म्हणून पालकांनी मुलांना नकार पचवायला शिकवले पाहिजे. पालकांनी मुलांवर अपेक्षांचं ओझेही लादू नये. विद्यार्थी आत्महत्या म्हणजे देशाची मोठी हानी त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आत्महत्या रोखण्याची जबाबदारी केवळ पालकांचीच आहे असे नाही तर शाळा, कॉलेज, शिक्षक, समाज आणि शासनाचीही आहे. या सर्व घटकांनी एकत्र येऊन विद्यार्थ्यांच्या आत्महत्या रोखणयासाठी प्रयत्न करायला हवेत.
-श्याम ठाणेदार