चिनी व्हायरसची लागण झालेल्या राऊतांना बरे करण्याची जडीबुटी देवाभाऊंकडेच
भाजपा माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांचा निशाणा
मुंबई महानगर पालिकेवर महायुतीचाच झेंडा फडकणार
उबाठाचे खा. संजय राऊत यांच्यात राहुल गांधींप्रमाणे चिनी व्हायरस शिरला आहे. या व्हायरसचा उत्तम इलाज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जडीबुटी देऊन करत असल्यानेच कधी नव्हे ते राऊतांनी श्री. फडणवीस यांचे कौतुक केलं आहे, अशी खोचक टिप्पणी भारतीय जनता पार्टीचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी शुक्रवारी केली. मात्र राऊतांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर अर्वाच्च भाषेत होणारी टीका आम्ही कदापि सहन करणार नाही,असा इशाराही श्री. बन यांनी दिला. प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी श्री. बन म्हणाले, की शिवराळ भाषेत आम्हीही बोलू शकतो पण आमच्यावर तसे संस्कार नाहीत. महापालिका निवडणुकीत काय उखडायचे ते उखडा पण मुंबईचा महापौर उबाठा गटाचा असेल असे म्हणणा-या श्री. राऊत यांचा खोचक शब्दांत श्री. बन यांनी समाचार घेतला. ”उखडायची भाषा करू नका. विधानसभा निवडणुकी मध्ये सर्वसामान्य मराठी, महाराष्ट्रीय माणसाने तुमचे मैदान साफ केले असल्याने उखडण्यासारखे काहीच आता तुमच्याकडे शिल्लक राहिलेलं नाही,” असा सणसणीत टोला श्री. बन यांनी लगावला. तुमचे उरले सुरले मैदान ही महायुती महापालिका निवडणुकीमध्ये साफ करणार आहे. मुंबई महापालिकेवर भाजपा महायुतीचाच झेंडा फडकणार, असा विश्वास त्यांनी बोलून दाखवला.
उबाठा ने दक्षिण मुंबईतून मराठी माणसाला हद्दपार केले.15 वर्षे तुमचा खासदार असताना, 25 वर्षे महापालिका तुमच्या ताब्यात असतानाही सर्वसामान्य मराठी माणसाचे हितरक्षण न करता उबाठा गटाने आणि श्री. राऊत यांनी त्यांचे हक्क हिसकावून घेत त्यांना थेट कल्याण, डोंबीवलीपर्यंत पळवून लावले अशी टीकेची झोड श्री. बन यांनी उठवली. देवेंद्र फडणवीस यांनी मात्र दक्षिण मुंबईतील बीडीडी चाळवासियांचे हित पाहीले. मराठी माणूस विस्थापित होणार नाही तर त्याला हक्काच्या जागेत प्रस्थापित करण्याचे प्रयत्न देवेंद्र फडणवीस सातत्याने करत असल्याचेही त्यांनी नमूद केले. बीडीडी चाळवासियांना माफक दरात त्यांच्याच जागेत घर देवाभाऊंनी मिळवून दिले. ज्या कोळी बांधवांना तुम्ही दक्षिण मुंबई सोडून जाण्यास भाग पाडत होतात त्या कोळीबांधवांनाही दक्षिण मुंबईतच घरे, सुविधा देण्याचे काम देवेंद्र फडणवीस करत आहेत .
