नाचनवेल चिंचोली परिसरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस वाहतूक ठप्प शेतीचे मोठे नुकसान
कन्नड/प्रतिनिधी/ कन्नड तालुक्यात आज दुपारी नाचनवेल व चिंचोली परिसरात मेघगर्जना, वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली. अचानक आलेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांची मोठी धावपळ उडाली असून, अनेक ठिकाणी शेतात पाणी साचून शेती तळ्याचे स्वरूप धारण करत असल्याचे चित्र दिसून आले. त्यामुळे पिकांचे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे.छत्रपती संभाजीनगर ते खान्देश मार्गावरील नाचनवेल बसस्थानकाजवळील छोट्या पुलावरून मोठ्या प्रमाणावर पाणी वाहिल्याने काही तास वाहतूक ठप्प झाली होती. दरवर्षी पावसाळ्यात येथे अशीच परिस्थिती उद्भवत असून, या ठिकाणी मोठा पूल होणे अत्यंत गरजेचे असल्याची स्थानिकांची मागणी आहे.दरम्यान, शेलगाव येथील नदी दुथडी भरून वाहत असल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत नदी, नाले व पूल पार करताना स्टंटबाजी करू नये, स्वतःचा जीव धोक्यात घालू नये, असे आवाहन कृषीभूषण भाऊसाहेब थोरात यांनी केले आहे. तसेच, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे तातडीने पंचनामे करून शासनाने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
