प्रति, माननीय संपादकजी,
विषय:- चिन्नास्वामी स्टेडियमवर एकीकडे मृत्यूचे तांडव तर दुसरीकडे उत्सवाचा आनंद ही कसली खुशी?
दिनांक ३ जूनला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू टिमने आयपीएलची मॅच १८ वर्षांनंतर जिंकून इतिहास घडविला हि बाब ठीक आहे याचे मनापासून स्वागत.परंतु दिनांक ४ जूनला बंगळुरू टिमने मॅच जिंकण्याची खुशी साजरी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमवर भव्य आयोजन करण्यात आले होते.परंतु या स्टेडियमच्या मैदानाची क्षमता फक्त ३५ हजार असतांना मर्यादेपेक्षा जास्त म्हणजे ३ लाखांपेक्षा जास्त लोक जमले यामुळे मैदानाबाहेर मोठ्या प्रमाणात चेंगराचेंगरी होऊन ११ लोकांचा मृत्यू झाला व ३० पेक्षा अधिक लोक गंभीररीत्या जखमी झाले.ही अत्यंत दुर्दैवी आणि अंगावर शहारे येणारी घटना चिन्नास्वामी स्टेडियमच्या परिसरात पहायला मिळाली व मोठ्या जल्लोषाला चेंगराचेंगरीचे गालबोट लागले.ही घटना कर्नाटक प्रशासन व कर्नाटक क्रिकेट असोसिएशन यांच्या निष्काळजीपणामुळे झाल्याचे स्पष्ट दिसून येते.आश्चर्याची गोष्ट म्हणजे एकीकडे लोक चेंगराचेंगरीत मृत्यूमुखी पडत आहे तर दुसरीकडे अनेक जण गंभीर जखमी स्थितीत आहे.तरीही कर्नाटक क्रिकेट असोसिएशन, कर्नाटक सरकार व आयपीएल जिंकलेली बैंगलूर टिम यांच्या डोळ्यासमोर स्टेडियमच्या बाहेर चेंगराचेंगरीमुळे झालेले मृत्यूचे तांडव व जखमींची भयावह स्थिती समोर असुन सुद्धा आनंद उत्सव साजरा केला ही अत्यंत घृणास्पद व मानवजातीला काळीमा फासणारी घटना आहे.एकीकडे लोक मरत आहेत आणि तुम्ही दुसरीकडे आनंद साजरा करता हा कसला जल्लोष! अशा आनंदाचा धिक्कार आहे.बंगळुरू क्रिकेट असोसिएशन व कर्नाटक सरकारने स्टेडियमच्या बाहेरील चेंगराचेंगरी यात मृत्यूमुखी पडलेले व जखमी झालेले संपूर्ण बंगळुरू टिमचे चहाते होते.अशा परिस्थितीत या कार्यक्रमाला ताबडतोब स्थगिती देवुन शोक प्रगट करने गरजेचे होते.परंतु दुखःची बाब म्हणजे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू टिमने आपल्या चहात्यांचा मृत्यू समोर ठेवून आनंद साजरा केला ही बाब अत्यंत दुर्भाग्य पुर्ण व निंदनीय बाब आहे याचा सर्वच स्तरातून निषेध व्हायला पाहिजे. बंगळुरू स्टेडियमवर ही भयावह घटना का व कशी झाली याची कठोर चौकशी व्हायला पाहिजे.या मृत्यूच्या उत्सवाला जबाबदार कोण? कारण एका वेळेस एकच गोष्ट शक्य आहे उत्सव किंवा दु:ख.परंतु कर्नाटकच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर एकाच वेळेस उत्सव व शोककळा दिसून आली ही बाब अत्यंत धक्कादायक व मानवतेला मोठी जखम करणारी म्हणावी लागेल.कारण मातरम् व उत्सव एकत्र होऊच शकत नाही.परंतु ही घटना कर्नाटकात दिसून आली या घटनेची जितकी निंदा कराल तितकी कमीच आहे.केंद्र सरकार व संपूर्ण राज्य सरकारांना विनंती करतो की बंगळुरू स्टेडियमवरील घटना लक्षात घेता अशा घटना भविष्या घडणार नाही याची जातीने खबरदारी घ्यावी व बीसीसीआयने सुध्दा या घटनेची दखल घेऊन पुढील कारवाई करावी. चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेली घटना अत्यंत दुर्दैवी आणि दु:खद असुन मृत्यूमुखी पडलेल्यांच्या प्रती श्रद्धांजली अर्पण करतो व त्यांच्या परिवाराला या घटनेपासुन सावरण्याची ईश्वर शक्ती प्रदान करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
लेखक
रमेश कृष्णराव लांजेवार
