चीनने विश्वासघातही स्वभाव सोडला तरच मैत्री शक्य
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या चीनच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनिपिंग यांची भेट घेतली. या भेटीत दोन्ही जागतिक नेत्यांत जवळपास पन्नास मिनिटे चर्चा झाली. या भेटीत अनेक विषयांवर चर्चा झाली. दोन्ही देशात बिघडलेले संबंध सुधारण्यावर या भेटीत भर देण्यात आला. या दौऱ्यात दोन्ही देशात करार होण्याची शक्यता आहे. २०१८ नंतर नरेंद्र मोदी यांचा हा पहिलाच चीन दौरा आहे. मोदींच्या या दौऱ्याकडे भारताचेच नाही तर जगाचे लक्ष लागले आहे कारण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर ५० टक्के अतिरिक्त शुल्क ( टॅरीफ ) लावल्यानंतर भारत आणि अमेरिकेचे संबंध कमालीचे बिघडले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी केवळ भारतावरच नाही तर चीन, मेक्सिको, कॅनडा, ब्राझील या आणि यासारख्या अन्य देशांवर देखील टॅरीफ लावले आहे. त्यामुळे भारतासह या देशातही अमेरिकेविरुद्ध प्रचंड नाराजी आहे. मात्र सर्वात जास्त चीड ही भारत आणि चीन या देशात आहे भारत आणि चीन या दोन्ही देशांवर अमेरिकेने प्रचंड टॅरीफ लावले आहेत त्यामुळे अमेरिकेच्या या दडपशाही विरुद्ध हे देश एकत्र येत आहे त्यामुळेच हा दौरा विशेष महत्वाचा ठरतो. काही दिवसांपूर्वीच भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर रशियाच्या दौऱ्यावर गेले होते तिथे दोन्ही देशांनी मिळून अमेरिकेची दडपशाही मोडून काढण्याचा निर्णय घेतला. रशिया पाठोपाठ आता चीनशी ही भारत सलगी वाढवत आये त्यामुळे अमेरिकेच्या विरोधात या तीन देशांची युती होत आहे असे मानले जात आहे. चीन आणि रशिया या जागतिक महासत्ता अमेरिकेच्या विरोधातच होत्या भारताचे अमेरिकेशी घनिष्ट संबंध होते मात्र डोनाल्ड ट्रम्प यांच्या हेकेखोर स्वभावामुळे भारतही आता अमेरिकेच्या विरुद्ध जाऊन चीन आणि रशिया यांच्या सोबत गेला तर त्याचे जागतिक राजकारणावर दुरगामी परिणाम होतील. अमेरिकेला शह देण्यासाठी हे तीन देश एकत्र आले तर अमेरिकेला निश्चितच पर्याय निर्माण होईल त्यामुळेच या दौऱ्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. भारत आणि रशिया हे पारंपरिक मित्र राष्ट्र आहे. संकटाच्या काळी या दोन्ही देशांनी एकमेकांना मदत केली आहे याउलट भारत आणि चीन हे एकमेकांचे कधीच मित्र नव्हते. भारत आणि चीनचे शत्रुत्व जगजाहीर आहे. चीनने भारताला कायम शत्रू मानले आहे. भारताने चीनशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवण्याचाच प्रयत्न केला चीनने मात्र भारताचा विश्वासघातच केला आहे. १९६२ साली भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांनी तर हिंदी चिनी भाई भाई म्हणत चीनशी मैत्रीचा हात पुढे केला होता मात्र चीनने भारताचा केसाने गळा कापत भारतावर आक्रमण करत भारताचा काही भूभाग बळकावला. त्यानंतरही चीनने अनेकदा भारताच्या खोड्या काढल्या. २०२० मध्ये गलवान खोऱ्यात चिनी आणि भारतीय सैनिकांची झालेली झपाटपट अजूनही ताजीच आहे या झटापटीत भारताचे २० जवान शहीद झाले होते. चीन भारताच्या गलवान खोऱ्यासह अरुणाचल प्रदेशावर दावा सांगतो. अरुणाचल प्रदेश हा चीनचाच भूभाग आहे असे चीन म्हणतो त्यामुळेच चीनशी भारताचे वैर आहे. भारत पाकिस्तान युद्धात चीनने कायम पाकिस्तानची बाजू घेतली आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या सिन्दुर संघर्षात चीनने पाकिस्तानची उघडपणे बाजू घेतली होती इतकेच नाही तर पाकिस्तानने या संघर्षात वापरलेले लष्करी साहित्यही चीननेच पुरवले होते म्हणूनच चीनवर भारत कसा विश्वास ठेवणार असा प्रश्न पडतो. चीन हा जगातील सर्वात अविश्वासू देश आहे. जेव्हा जेव्हा भारताने चीनशी मैत्रीचा हात पुढे केला त्या त्या वेळी चीनने भारताचा विश्वासघात केला त्याचीच पुनरावृत्ती आता होईल की काय अशी शंका उपस्थित केली जाते आणि ती रास्तही आहे पण बदललेल्या राजकीय परिस्थितीत या दोन्ही देशांना एकत्र येण्याशिवाय पर्यायही नाही. अमेरिकेला शह द्यायचा असेल तर भारत, रशिया आणि चीन यांना एकत्र यावेच लागेल. जागतिक राजकारणातले हे तीन देश एकत्र येत आहे हे स्वागतार्ह आहे. भारत, रशिया आणि चीन यांचा त्रिकोण झाला तर तर त्याचा जागतिक राजकारणावर दुरगामी परिणाम होणार हे निश्चित. मात्र त्यासाठी यातील तिसरा कोण असलेल्या चीनने जर आपला विश्र्वासघातकी स्वभाव सोडून दिला तरच हे शक्य आहे. अमेरिकेला शह देण्याची चीनची खरोखर इच्छा असेल तर त्यांनी मनापासून भारताशी मैत्री करायला हवी आणि आपल्यावर लागलेले विश्र्वासघातकी हे बिरूद काढून टाकायला हवे. मागील अनुभव पाहता हे होईल असे छातीठोकपणे कोणी सांगू शकणार नाही मात्र कोठून तरी सुरवात झाली हे देखील सुचिन्ह म्हणावे लागेल. दोन्ही देशांना मजबुरीने का होईना एकत्र यावे लागत आहे. आता एकत्र राहायचे मैत्रीचे संबंध प्रस्थापित करायचे हे चीनच्या हातात आहे ही एक सु संधी आहे. या संधीचे सोने करायचे की नेहमीप्रमाणे माती करायची हे चीनच्या हातात आहे.
-श्याम ठाणेदार