भ्रष्टाचार करणाऱ्यांनो सावधान, सीबीआयची करडी नजर
जालना जिल्हा व्यापारी महासंघ व केंद्रीय अन्वेषण ब्युरो ( सीबीआय) एसीबी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने भ्रष्टाचार प्रतिबंध व जागरूकता चर्चासत्राचे आयोजन हॉटेल विजय विलासच्या बँक्वेट हॉलमध्ये करण्यात आले होते.
चर्चासत्रात कार्यक्रमाचे अध्यक्ष मराठवाडा चेंबर ऑफ ट्रेड अँड कॉमर्सचे महासचिव शाम लोया हे होते. प्रस्तावना व्यापारी महासंघाचे अध्यक्ष विनीत सहानी यांनी केले तर महासंघाचे महासचिव संजय दाड, संघटक प्रमुख राजेश राऊत, इंदर तवरवाला, कोषाध्यक्ष विजय राठी व्यासपीठावर उपस्थित होते. सूत्रसंचालन विनोद कुमावत यांनी केले.
सजीष नायर म्हणाले की, केंद्रीय कर्मचाऱ्यांनी भ्रष्ट मार्गाने मालमत्ता जमा केली असेल व त्याची नागरिकांना माहिती असेल तर त्याची सुद्धा तक्रार आपण या कार्यालयाकडे करू शकता. सीबीआय अँटी करप्शन ब्युरो च्या ट्रॅप मध्ये अडकलेल्या कर्मचाऱ्यांना शिक्षा देण्याचे प्रमाण चांगले आहे असे ही ते म्हणाले. मजबुरीत एखाद्या नागरिकाने एखाद्या कर्मचाऱ्यास लाच दिली व त्याने अँटीकरप्शन ब्युरोला सात दिवसाच्या आत कळवले तर त्याच्यावर कुठलाही गुन्हा दाखल होणार नाही असेही ते म्हणाले.
शाम लोया म्हणाले की, नागरिकाच्या कायद्याच्या अज्ञानाचा सरकारी कर्मचारी कसा फायदा घेतात याचे सोदाहरण त्यांनी स्पष्ट केले. केंद्रीय व राज्य अँटी करप्शन ब्युरोचा भ्रष्ट कर्मचाऱ्यावर अजूनही धाक बसला नसून भ्रष्ट कर्मचाऱ्यास शिक्षेचे प्रमाण फार कमी असल्याची तक्रार उपस्थित व्यापारी वर्गाने सीबीआय अधिकाऱ्याकडे केली. भ्रष्टाचार करणाऱ्या कर्मचाऱ्यावर कठोर शिक्षेची तरतूद करावी व बडतर्फीची कारवाई होत नाही तोपर्यंत या भ्रष्टाचारी लोकांवर कायद्याचा धाक त्यांच्यावर बसणार नाही, अशी ही व्यापारी बांधवांकडून मागणी करण्यात आली. कार्यक्रमास सीए गोविंदप्रसाद मुंदडा, लक्ष्मीनारायण मानधना, विजय बगडिया, सुभाष देविदान, क्रेडाइ संघटनेचे अध्यक्ष विठ्ठल पवार, चेतन मराठे, पंकज कासलीवाल रविंद्र हुसे, भोसले, लघुउद्योग भरतीचे अध्यक्ष पंकज कासलीवाल, अॅड. महेश धनावत, प्रमोद गंडाल, विनोद पवार, योगेश ठक्कर, शहा अादी उपस्थित होते.
