Sunday, October 26, 2025
Homeऔरंगाबादबसपचे राष्ट्रीय संयोजक मा.आकाश आनंद यांचे भव्य स्वागत !

बसपचे राष्ट्रीय संयोजक मा.आकाश आनंद यांचे भव्य स्वागत !

बसपचे राष्ट्रीय संयोजक मा.आकाश आनंद यांचे भव्य स्वागत !
 
महाराष्ट्रासह गुजरात मधील संघटन बांधणीचा घेतला आढावा
 
आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने कॅडरला कामाला लागण्याचे आदेश

मुंबई:-  विधानसभा आणि बूथ पातळीवर पक्षाची संघटन बांधणी मजबूत ठेवली तर आगामी काळात महाराष्ट्र, गुजरातसह इतर राज्यांमध्ये बहुजन समाज पक्षाचाच मुख्यमंत्री होईल, असे प्रतिपादन पक्षाचे राष्ट्रीय संयोजक, युवा नेते मा.आकाश आनंद यांनी आज, रविवारी (ता.३१) केले. मुंबईतील के.सी कॉलेज ऑडिटोरियम, चर्चगेट येथे पक्षाची आढावा बैठक पार पडली. मा.आकाश आनंद यांनी यावेळी दोन्ही राज्यातील पक्ष संघटन बांधणीचा आढावा घेत वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली.तथागत भगवान गौतम बुद्धांची मुर्ती भेट देवून राज्याचे प्रदेश महासचिव,पश्चिम महाराष्ट्र झोन मुख्य प्रभारी डॉ.हुलगेश चलवादी यांनी मा.आकाश साहेबांचे छत्रपती-फुले-शाहू-आंबेडकरांच्या पुण्य पुरोगामी महाराष्ट्रात स्वागत केले.

आढावा बैठकीतून मा.आकाश साहेबांनी यांनी महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांचा राज्याचे महासचिव आणि सचिव यांच्याकडून आढावा घेत चर्चा केली.पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अॅड.सुनील डोंगरे साहेब यांनी राज्यातील पक्षाची संघटनबांधणी संदर्भात त्यांना माहिती दिली. बैठकीत नॅशनल कॉडिनेटर आणि माजी खासदार राजाराम जी, महाराष्ट्राचे नवनियुक्त प्रभारी मा.मोहित आनंद, गुजरात चे प्रभारी आणि नॅशनल कॉडिनेटर अतर सिंह,गुजरातचे प्रदेशाध्यक्ष मा.बघुभाई परमार,महाराष्ट्र प्रभारी रामचंद्र जाधव, सुनील शिंदे तसेच दोन्ही राज्याचे राज्य महासचिव, सचिव आणि प्रदेश कार्यकारिणी सदस्य, सर्व जिल्हाध्यक्ष प्रामुख्याने उपस्थित होते.

पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा मा.सुश्री बहन मायावती जी यांनी नुकतीच मा.आकाश आनंद यांच्यावर राष्ट्रीय संयोजक पदाची जबाबदारी सोपवली आहे. ही जबाबदारी स्वीकारल्यानंतर मा.आकाश आनंद पहिल्यांदाच आढावा बैठकीच्या निमित्ताने महाराष्ट्रात आले होते. महाराष्ट्रात आणि गुजरात मध्ये आगामी काळात होवू घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मा.आकाश साहेबांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.

मान्यवर कांशीराम जी यांनी अथक मेहनत घेवून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि बहुजनांच्या हाती सत्तेची किल्ली सोपवण्यासाठी स्थापन केलेला बहुजन समाज पक्ष घरोघरी पोहचला आहे. बसपा च्या विचारधारेला समाजकारणासाठी सत्ताकारणाची जोड हवी आहे. मा.सुश्री बहन मायावती जी यांनी देशातील सर्वात मोठे राज्य उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री पद चार वेळा भूषवून बहुजनांचा सत्तेतील वाटा सुनिश्चित केला. उत्तर प्रदेशाप्रमाणे देशातील इतर राज्यात बहुजनातून मुख्यमंत्री होऊ शकतो. पक्षाचे कॅडर आणि हितधारकांच्या मदतीनेच हे स्वप्न पूर्ण केले जावू शकते, असे प्रतिपादन मा.आकाश आनंद यांनी पदाधिकार्यांना संबोधित करतांना केले.

पक्षाची विचारधारा आणि मिशन घरोघरी पोहचवण्यासाठी बूथ आणि विधानसभा रचनेनूसार कॅडर तसेच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना मेहनत घ्यावी लागेल. याशिवाय बहुजनांची शासनकर्ती जमात होण्याचे स्वप्न पूर्ण होणार नाही.बहुजन समाज पार्टी हे त्यासाठीचे एकमेव माध्यम आहे. बहुजनांनी त्यामुळे पक्षाला आणखी बळकट करण्याची गरज असल्याचे मत यावेळी मा.आकाश आनंद यांनी व्यक्त केले. आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने तयारीला लागण्याचे आदेश त्यांनी बैठकीतून कॅडरला दिले, अशी माहिती पक्षाचे प्रदेश महासचिव, पश्चिम महाराष्ट्र झोन मुख्य प्रभारी डॉ.हुलगेश चलवादी यांनी दिली.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments