Sunday, October 26, 2025
Homeऔरंगाबादपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बीएसएनएलच्या स्वदेशी निर्मित ‘4जी’ सेवेचे लोकार्पण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बीएसएनएलच्या स्वदेशी निर्मित ‘4जी’ सेवेचे लोकार्पण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बीएसएनएलच्या स्वदेशी निर्मित ‘4जी’ सेवेचे लोकार्पण

पुणे, दि. 27 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आत्मनिर्भर भारत योजनेंतर्गत संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या  ‘4G’ तंत्रज्ञानाधारित सेवेचे लोकार्पण झारसुगुडा ओडिशा येथून दूरदृश्य प्रणालीद्वारे झाले. याअंतर्गत बीएसएनएलच्या 92 हजार 633 टॉवर्सचे लोकार्पण झाले असून, यापैकी 9 हजार 30 टॉवर्स महाराष्ट्रात उभारले गेले आहेत. या माध्यमातून देशातील तसेच राज्यातील लाखो लोकांपर्यंत 4जी तंत्रज्ञान पोहोचणार असून महाराष्ट्र शासनाच्या अकराशे ऑनलाईन सेवा गावागावात पोहोचण्यात या कनेक्टिव्हिटीचा फायदा होणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

पंतप्रधान श्री. मोदी यांच्या हस्ते ‘4G’ नेटवर्कच्या दूरदृष्य प्रणालीद्वारे लोकार्पणानिमित्त साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सांस्कृतिक कला मंदिर येरवडा येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. याप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय युवक कार्य व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, भारती एअरटेलचे संस्थापक अध्यक्ष सुनील मित्तल, खासदार मेधा कुलकर्णी, बीएसएनएलचे मुख्य महाव्यवस्थापक हरिंदर कुमार, दूरसंचार विभागाचे विशेष महासंचालक आर. के. गोयल उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, महाराष्ट्रात राज्य शासनाकडून नागरिकांना दिल्या जाणाऱ्या अकराशे सेवा ऑनलाईन आणि व्हॉट्सॲपवर उपलब्ध करून देण्यात येत आहेत. यातील 90 टक्के सेवा एन्ड टू एन्ड डिजिटल करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांना बसल्या जागी त्याच्या अर्जाची माहिती मिळणार आहे. सेवा हमी कायद्याची अंमलबजावणी खऱ्या अर्थाने करण्यात येत आहे. नागरिकांना आपल्या मोबाईलवरून सेवा उपलब्ध करून देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. यासाठी कनेक्टिव्हिटी असणे आवश्यक आहे. गावोगावी भारतनेटच्या माध्यमातून फायबर सेवा उपलब्ध करून देण्यात येत असल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धन्यवाद दिले आणि बीएसएनएलचे अभिनंदन केले.

बीएसएनएलच्या 92 हजार 633 टॉवर्सचे लोकार्पण होणे ही आनंदाची बाब असल्याचे नमूद करून मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, यातील 9 हजार 30 टॉवर्स महाराष्ट्रातील आहे. देशातील 24 हजार 680 हजार गावांना या टावर्सच्या माध्यमातून ‘4जी’ नेटवर्क उपलब्ध होणार आहे. देशाला विकसित करण्यासाठी परस्पर दळणवळण (कम्युनिकेशन) महत्त्वाचे आहे. 21 व्या शतकाच्या सुरुवातीला तत्कालीन पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी यांनी विकासाचा मार्ग हा दळणवळण असल्याचे म्हटले होते. त्यांनी दळणवळणाच्या दृष्टीने देशाला आणि गावांना रस्त्यांच्या माध्यमातून जोडण्यासाठी सुवर्ण चतुष्कोन योजना आणि पंतप्रधान ग्राम सडक योजना सुरू केल्या. आता 21 व्या शतकात विकासासाठी केवळ रस्तेच नाही तर कनेक्टिव्हिटी महत्त्वाची असल्याचे लक्षात आले. मोबाईल कनेक्टीव्हिटी आणि इंटरनेट गावात पोहोचविल्याशिवाय या शतकातील विकास गावापर्यंत पोहोचविता येत नाही. त्यामुळे गावागावात हे तंत्रज्ञान पोहोचविण्यासाठी 4जी टॉवर्सची निर्मिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात झाली.

सुरूवातीला स्वतःचे 4जी तंत्रज्ञान फिनलँड, स्वीडन, चीन आणि दक्षिण कोरिया या चार देशांकडे होते. चीन हे तंत्रज्ञान देण्यासाठी सहकार्य करणार नव्हते. त्यामुळे आत्मनिर्भर भारत करण्यासाठी तंत्रज्ञान निर्मितीसाठी देशातील कंपन्यांना एकत्रित करून प्रयत्न सुरू झाले. सी-डॉट, तेजस, आयआयटी, तेजस, टीएसएस आणि बीएसएनएल यांनी देशी तंत्रज्ञानावर आधारित 4जी तंत्रज्ञानाची निर्मिती करून भारत या क्षेत्रातील पाचवा देश बनला आहे. भारताला ज्या-ज्यावेळी कोणी आव्हान दिले त्यावेळी भारताने आपली क्षमता दाखवून दिली आहे. भारतातील ज्ञान, तेज, कर्मण्यतेद्वारे आपण जगाला उत्तर देऊ शकतो आणि आजचा कार्यक्रम त्याचाच एक भाग आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

गावात इंटरनेट पोहोचते तेव्हा आपण गावाला जगाशी जोडत असतो. आरोग्य, शिक्षण क्षेत्रासाठी कनेक्टिव्हिटी महत्त्वाची आहे. शेतकऱ्यांना हवामानाची, वातावरण बदलाची माहिती देऊन त्यांचे नुकसान टाळता येते. स्मार्ट व्हिलेजच्या सहाय्याने गावातील सर्व व्यवस्था उत्तम करता येतात. उद्योग, शेती, बाजारासाठी कनेक्टिव्हिटी महत्त्वाची आहे. कनेक्टिव्हिटीमुळे व्यवस्थेत परिवर्तन होण्यासोबत पारदर्शकता येते. तंत्रज्ञान ही भेदरहित व्यवस्था आहे. ते गावापर्यंत पोहोचविण्याचे साधन म्हणजे ही 4जी कनेक्टिव्हिटी आहे. या टॉवर्समध्ये 5जी मध्ये अद्ययावत होण्याची क्षमता आहे. तंत्रज्ञान निर्माण करण्यात यश आल्याने जगाच्या एक पाऊल पुढे जाण्याची आपली तयारी आहे, असे श्री. फडणवीस यांनी सांगितले.

बीएसएनएलची स्वदेशी ‘4जी’ची यशोगाथा जगात उल्लेखनीय ठरेल – एकनाथ शिंदे

उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, आत्मनिर्भर सशक्त भारताच्या दृष्टीने आजचा क्षण अत्यंत महत्त्वाचा आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताने आपली ओळख निर्माण केली आहे. औद्योगिक क्रांतीच्यानंतरचे हे सर्वात मोठे अभियान आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात भारताने एक महासत्ता म्हणून आपले स्थान पक्के केले आहे.

बीएसएनएल आता नफ्यात आले असून पुढे जात असल्याचा आनंद आहे. स्वदेशी ‘4जी’ तंत्रज्ञान विकसित करून डिजिटल भारताकडे आपली वाटचाल सुरू आहे. बीएसएनएल पुढे जाण्यासाठी हे तंत्रज्ञान म्हणजे महत्त्वाचे पाऊल आहे. जे अमेरिकेला साध्य झाले नाही ते भारताने करून दाखविले आहे. ग्रामीण भागाला, ग्रामीण भागात शिक्षण, दूरस्थ आरोग्य सेवा (टेलिमिडेसिन), पर्यटन आदीला याचा फायदा होईल. बीएसएनएलची स्वदेशी ‘4जी’ची यशोगाथा जगात उल्लेखनीय ठरेल. या तंत्रज्ञानामुळे बीएसएनएलचा नवा प्रवास सुरू होत आहे. 2047 पर्यंत विकसित भारताचे पंतप्रधान श्री. मोदी यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जे जे सहाय्य लागेल ते महाराष्ट्र करेल, असेही श्री. शिंदे म्हणाले.

केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती खडसे म्हणाल्या, पंतप्रधान यांचे आत्मनिर्भरतेचे स्वप्न बीएसएनएलच्या माध्यमातून पूर्ण होताना दिसत आहे. स्वदेशी 4जी तंत्रज्ञान फक्त 22 महिन्यात विकसित करून भारताने जगात नवी ओळख निर्माण केली आहे. नेटवर्किंग, संरक्षण क्षेत्र, अवकाश विज्ञान, माहिती तंत्रज्ञान आदी क्षेत्रात भारताची क्षमता जगासमोर येऊ लागली आहे. पुढील काळात आपण 5जी आणि 6जी कडे जाणार आहोत. या नेटवर्कच्या माध्यमातून ग्रामीण, आदिवासी भागात जाणार असून 25 हजार ठिकाणी पोहोचणार आहोत. स्वतःचे तंत्रज्ञान विकसित झाल्याने राष्ट्रीय सुरक्षेसाठी हे अत्यंत महत्वाचे पाऊल आहे, असेही त्या म्हणाल्या.

प्रास्ताविकात हरिंदर कुमार यांनी महाराष्ट्रात 9 हजार 139 टॉवर्सचे उद्घाटन होत असून त्यात डिजिटल भारत निधी 4जी प्रकल्पांतर्गत 2 हजार 174 टॉवर्सचा समावेश आहे. राज्य शासनाने 2 हजार 751 टॉवर्ससाठी विनामूल्य जमीन उपलब्ध करून दिली असून वीजेची व्यवस्था, टॉवर्सपर्यंत पोहोचण्याचा रस्त्यांचा अधिकार (राईट ऑफ वे) आदी सुविधांद्वारे सहकार्य केले आहे. आगामी काळात 930 अतिरिक्त टॉवर्सद्वारे जोडणी नसलेल्या गावांपर्यंत पोहणार असल्याची माहिती दिली.

यावेळी आमदार विजय शिवतारे, अमित गोरखे, योगेश टिळेकर, जगदीश मुळीक, हेमंत रासने, बापू पठारे आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments