बोधी दिन: मानवजागृती आणि सामाजिक परिवर्तनाचा मार्ग
जगाच्या इतिहासात काही दिवस फक्त प्रसंग म्हणून नाही तर बदलांचे बिंदू म्हणून ओळखले जातात. अशा दिवसांपैकी एक म्हणजे ८ डिसेंबर बोधी दिन होय. हा दिवस केवळ बौद्ध धर्मीयांसाठी अध्यात्मिक महत्त्वाचा नाही, तर संपूर्ण मानवजातीसाठी विचार, विवेक, करुणा आणि सामाजिक न्यायाची स्मृती जागवणारा दिवस आहे. कारण याच दिवशी राजकुमार सिद्धार्थांनी बोधी वृक्षाखाली ध्यानधारणा करत करत जीवनातील अनंत दुःख, विषमता, युद्ध, सत्ता, लोभ व अन्यायाच्या संकटांचे मूळ शोधत अखेर ज्ञानप्राप्ती केली आणि ते गौतम बुद्ध झाले. म्हणूनच बोधी दिन ही केवळ धार्मिक घटना नाही, तर मानवजातीच्या सामाजिक, नैतिक, तत्त्वज्ञानिक आणि मानवतावादी प्रवासातील एक अविस्मरणीय मैलाचा दगड आहे.
मानव समाजाच्या उत्क्रांतीत अनेकदा युद्धांनी, एकाधिकारशाहीने, साम्राज्यवादाने आणि सामाजिक जात-धर्म-वंशभेदांनी दहशत निर्माण केली. आपल्याला प्रश्न असा पडतो की मानवाला मानव बनविणारा मार्ग कोणता? शक्तीचा की प्रज्ञेचा? तर बुद्धांचे उत्तर होते की शांततेचा, नैतिकतेचा, करुणेचा, समानतेचा आणि मध्यममार्गाचा. म्हणूनच समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहता बोधी दिन हा केवळ आध्यात्मिक ज्ञानाचा उत्सव नाही तर मानवी समाजाला न्याय्य, समतामूलक आणि नैतिक दिशेने प्रवास करण्याची प्रेरणा देणारा दिवस आहे.
इतिहासात पाहिल्यास, ज्ञानप्राप्तीपूर्वीचा सिद्धार्थ हा केवळ एखाद्या राज्यातील राजकुमार नव्हता; तो एक संवेदनशील निरीक्षक होता. मृत्यू, रोग, वृध्दत्व आणि दारिद्र्य या चार सत्यांनी त्याला हादरवले. समाजशास्त्रीय दृष्टीकोनातून हे प्रश्न आजही तेवढेच जिवंत आहेत. जग प्रगत झाले असे म्हणवले जाते, पण भूक, युद्ध, सामाजिक असमानता, मानसिक तणाव, जातीय संघर्ष, धार्मिक कट्टरता आणि उपभोगवाद-नफा-आधारित जीवनपद्धतीने मानवाला पुन्हा असहाय्य बनवले आहे. अशा काळात बोधी दिनाचे महत्त्व अधिक अधोरेखित होते.
गौतम बुद्धांच्या शिकवणीत धम्म हा कर्तव्य, नैतिकता आणि विवेक होता. त्यामुळे धम्म म्हणजे कर्मकांड, जप-तप, पुरोहिती किंवा अंधश्रद्धा नव्हे, तर समाजाला समता आणि न्याय मिळवून देणारी प्रेरणा. म्हणूनच बुद्ध म्हणतात की “अप्प दीपो भव” म्हणजेच स्वतःचा दीप स्वतः बना. समाजशास्त्रीय अर्थ असा की, प्रत्येक व्यक्तीने आत्मबोध, विचारमंथन आणि नैतिक धैर्य विकसित केले पाहिजे; कारण परिवर्तन हे बाहेरून लादले जाणारे नसते तर ते अंतर्मनातून जन्मते.
बोधी दिन मानव स्वभावातील तीन प्रमुख प्रवृत्तींकडे निर्देश करतो, त्यामध्ये पहिली प्रवृत्ती म्हणजे लोभ म्हणजेच अत्यंत मिळवण्याची इच्छा होय. आधुनिक समाजशास्त्र सांगते की बाजारव्यवस्था भौतिक समाधान देऊ शकते, पण ती आध्यात्मिक आणि भावनिक शांती देऊ शकत नाही. दुसरी प्रवृत्ती आहे द्वेष होय. आजही आपण पाहतो की राजकारणात, धर्मांमध्ये, समाजवर्गांमध्ये, डिजिटल माध्यमात आणि राष्ट्रांमध्ये लोकांमध्ये मतभेदांपेक्षा तिरस्कार वाढत आहे. बुद्ध म्हणतात की द्वेषाने द्वेष संपत नाही; प्रेमानेच तो संपतो. तिसरी प्रवृत्ती म्हणजे अज्ञान होय. दडपशाही, भेदभाव, हिंसा आणि कट्टरतेचा मूलाधार. समाजातील अन्याय, जातीय दमन, पितृसत्ता, वर्ण-जातिवाद, आर्थिक शोषण, पर्यावरणाचा विनाश यांची मुळे मानवी अज्ञानात आणि अविचारी कृतीत आहेत. बोधी म्हणजे हे अज्ञान दूर करण्याची प्रक्रिया होय.
म्हणूनच बोधी दिन मानवाला स्मरण करून देतो की ज्ञान म्हणजे माहिती नव्हे, तर जागृती. आज इंटरनेट, कृत्रिम बुद्धिमत्ता, जागतिकीकरण आणि डिजिटल संपर्कामुळे माहितीचे जग फुलले आहे; पण शांती, श्रद्धा, मानवता आणि संयम कोठेतरी हरवले आहेत. म्हणूनच बुद्धांचे तत्त्वज्ञान समाजशास्त्रीय प्रश्न विचारते की आपण अधिक प्रगत झालो आहोत, की फक्त अधिक गुंतागुंतीचे आणि अस्थिर झालोआहोत?
बोधी दिन आपल्याला न्यायाच्या, समतेच्या, संवादाच्या आणि अहिंसेच्या नव्या मूल्यांना स्वीकारण्याचे आह्वान देतो. बुद्धांनी लोकशाहीचा पाया मांडताना संघ, विचारस्वातंत्र्य, मतभेदांचा सन्मान आणि सार्वत्रिक करुणा या तत्त्वांना केंद्रस्थानी ठेवले. आजच्या लोकशाही व्यवस्थेत या मूल्यांची पुन्हा गरज भासते. कारण विचारविनिमयाऐवजी संघर्ष, सहिष्णुतेऐवजी कट्टरता आणि मानवी हक्कांऐवजी नियंत्रणवाद वाढताना दिसतो आहे. म्हणूनच बोधी दिन आपल्याला सांगतो की समाजाची उभारणी वर्चस्वावर नाही, तर सहजीवनावर होते.
याच संदर्भात बुद्धांनी समाजातील सर्वात उपेक्षित घटक म्हणजेच महिला, शूद्र, वंचित, संघर्षग्रस्त आणि पीडित घटकांमध्ये मानवी समानतेचे तत्त्व पहिल्यांदा प्रत्यक्षात आणले. समाजातील प्रत्येक जण जात, लिंग, वर्ग, धर्म, व्यवसाय किंवा जन्माच्या आधारे समान आहे हे तत्त्व सामाजिक न्यायासाठी आजही महत्त्वाचे आहे.
बोधी दिन हा वर्तमानातील मानसिक आरोग्याच्या संकटांनाही उत्तर देतो. आधुनिक जीवनशैली वेगवान, स्पर्धात्मक, तणावग्रस्त आणि यांत्रिक झाली आहे. बुद्धांचे ध्यान, सम्यक स्मृती, मन:शांतता आणि प्रज्ञेचे तत्त्व आज जागतिक मानसिक आरोग्य चळवळीचे आधार आहे. जागरूकता, ध्यान, भावनिक बुद्धिमत्ता (mindfulness, meditation, emotional intelligence) यांचा उगम हा बोधीच्या तत्त्वज्ञानातच आहे.
बोधी दिन आपल्याला पर्यावरणीय जाणीव देखील शिकवतो. बुद्धांनी निसर्गासोबत संघर्ष नव्हे, तर सह-अस्तित्व सुचवले. आज पृथ्वीला हवामान बदल, प्रदूषण, जैवविविधतेचा ऱ्हास, नद्यांचा मृत्यू, जंगलांचा विनाश आणि प्राणी-मानव संघर्ष या समस्या भेडसावत आहेत. अशावेळी “सर्व प्राणी माझेच आहेत” हा बुद्धांचा संदेश आजच्या पर्यावरणीय नैतिकतेचा मूळ पाया ठरतो. याच अर्थाने बोधी दिन हा केवळ स्मरणदिन नाही तर तो सततच्या आत्मपरीक्षणाचा दिवस आहे. बुद्धांनी सांगितले की मनुष्याचे दुःख भाग्याने नव्हे, तर त्याच्या विचारांनी आणि कृतींनी निर्माण होते. म्हणून बदल हवा असेल तर तो आतून सुरू झाला पाहिजे.
आजच्या काळात बोधी दिनाचा संदेश जगभराला एका नव्या सामाजिक कराराची गरज सांगतो तो संदेश म्हणजे, जिथे धर्म हिंसा नव्हे, संवाद निर्माण करतो. जिथे तंत्रज्ञान मानवतेची परिपूर्ती करतो. जिथे समीक्षाशील विचार आणि करुणा एकत्र येतात. जिथे समाज फक्त विकसित नसतो, तर मनानेही सभ्य असतो. या अर्थाने बोधी ही स्वतःमध्ये एक अंतरिक क्रांती आहे. ती जीवनाच्या संघर्षांना टाळणारी नाही, तर त्या संघर्षांचे स्वरूप समजून शांततेने त्यावर उत्तर शोधणारी आहे. बोधी दिन ही एक जाणीव आहे की जग बदलण्यासाठी पहिले पाऊल म्हणजे स्वतःला बदलणे होय.
आज ८ डिसेंबरच्या या दिवशी आपण सर्वांनी स्वतःला विचारावे की “आपण जागृत आहोत की फक्त जागे आहोत?”
कारण बुद्धांच्या मते, मनुष्य जन्माला येतो, पण मानव बनण्यासाठी त्याला विवेक, करुणा, दया आणि समता अंगीकारावी लागते. बोधी दिन आपल्याला एकच संदेश देतो की, शांती ही बाह्य मिळकत नाही; ती अंतर्मनातून उगम पावलेली प्रज्ञा आहे. आणि हीच प्रज्ञा समाजाला न्याय्य, समतामूलक, शोषणमुक्त आणि सौहार्दपूर्ण बनवू शकते. म्हणून आजच्या या पवित्र दिवशी आपण फक्त स्मरण नव्हे तर अनुकरण करण्याचा संकल्प करूया. कारण जेव्हा प्रत्येक मानव बोधी होईल, तेव्हा जगात खऱ्या अर्थाने सुंदरता, शांती आणि मानवता नांदेल.
-डॉ. राजेंद्र बगाटे
