देशाच्या स्वातंत्र्यदिना बरोबर निरंकारी मिशनने साजरे केले
आत्मिक जागृतीचे पावन पर्व : मुक्ती पर्व
भक्तीमध्ये स्वातंत्र्याची मुक्ती
– निरंकारी राजपिता रमितजी
जालना : संपूर्ण भारतवर्षात जिथे स्वातंत्र्याच्या 79 व्या गौरवशाली वर्षांचा उत्सव साजरा केला, तिथे संत निरंकारी मिशनने आत्मिक स्वातंत्र्याच्या रूपात श्रद्धा आणि समर्पणाने युक्त अशा मुक्ती पर्व दिवसाचे आयोजन केले. हे पर्व केवळ एक स्मरण नाही, तर आत्मिक चेतनेची जागृती आणि जीवनाचा परम उद्देश याचे प्रतीक आहे. मुक्ती पर्व दिवसाचा मुख्य संत समागम आदरणीय निरंकारी राजपिता रमितजी यांच्या पावन अध्यक्षतेखाली दिल्लीतील निरंकारी ग्राउंड क्र.8, बुराडी रोड येथे आयोजित करण्यात आला. तसेच विश्वभरातील मिशनच्या सर्व शाखांमध्येही मुक्ती पर्वाच्या निमित्ताने विशेष सत्संग कार्यक्रमाचे आयोजन करत मिशनमध्ये होऊन गेलेल्या महान संतांना अभिवादन करण्यात आले. त्यामध्ये शहनशाह बाबा अवतारसिंहजी, जगत माता बुद्धवंतीजी, राजमाता कुलवंत कौरजी, माता सविंदर हरदेवजी, भाईसाहेब प्रधान लाभ सिंहजी व इतर अनेक समर्पित संतांचे हृदयपूर्वक स्मरण करुन त्यांच्या दिव्य जीवनातून प्रेरणा प्राप्त करण्यात आली. स्थानिक स्तरावर संत निरंकारी सत्संग भवन, गांधी चमन, रेल्वे स्टेशन रोड, जालना येथे मुक्ती पर्व दिवसानिमित्त विशेष सत्संग समारोह आयोजित करण्यात आला ज्यामध्ये ग्रामीण आणि शहरी भागातील भाविक भक्तगणांनी मोठ्या संख्येने भाग घेतला. आध्यात्मिकतेच्या पवित्र वातावरणात समस्त भक्तगणांना संबोधित करताना निरंकारी राजपिताजी म्हणाले, की आज 15 ऑगस्टला संपूर्ण देश स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करत आहे. त्याच वेळी संतजन याला मुक्ती पर्वाच्या माध्यमातून आत्मचेतना आणि भक्तीचा संदेश देऊन साजरा करत आहेत. जसे तिरंगा झेंडा आणि देशभक्तीपर गीतं स्वातंत्र्याचे प्रतीक आहेत तसेच एका भक्ताचे जीवन सेवा, समर्पण आणि भक्तीच्या सुगंधाने भरलेले असते. सतगुरूंनी दिलेल्या ब्रह्मज्ञानात खरे स्वातंत्र्य आहे जे आपल्याला मीपणा आणि अहंकारापासून मुक्त करते. मुक्ती पर्वाची मूळ भावना ही आहे, की जसे भौतिक स्वातंत्र्यता आपल्याला राष्ट्राच्या उन्नतीचा मार्ग दाखवते, तसेच आत्मिक स्वातंत्र्यता अर्थात जन्म-मृत्यूच्या बंधनातून मुक्तता ही मानवी जीवनाची परम उपलब्धी आहे. ही मुक्ती केवळ ब्रह्मज्ञानाच्या दिव्य ज्योतीमुळेच शक्य आहे, जी आत्म्याला परमात्म्याशी जोडते आणि या मानवी जीवनाच्या वास्तविक उद्देशाचा बोध करून देते.
