Monday, March 30, 2026
Homeऔरंगाबादधर्माबाद मध्ये भाजपवर ‘मजप’ भारी !

धर्माबाद मध्ये भाजपवर ‘मजप’ भारी !

धर्माबाद मध्ये भाजपवर ‘मजप’ भारी !
धर्माबाद:- धर्माबाद नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत देशभरात प्रमुख पक्ष ठरलेल्या भारतीय जनता पार्टी आणि इतर राष्ट्रीय,प्रादेशिक पक्षावर धर्माबादचं स्थानिक नेतृत्व भलतंच भारी पडल्याचे दिसत आहे. नव्यानेच स्वबळावर निवडणुकीत उतरलेल्या मराठवाडा जनहित पक्षाने सर्वच राष्ट्रीय पक्ष,प्रमुख पुढाऱ्यांचे धाबे दणाणून सोडले आहेत. नगराध्यक्ष पदासह १५ सदस्यपदांच्या जागेवर भरघोस मतांनी विजय मिळवत मराठवाडा जनहित पक्षाने एकहाती सत्ता मिळवली आहे.
       धर्माबादच्या इतिहासात पहिल्यांदाच एका राष्ट्रीय पक्षांशिवाय स्थानिक नेतृत्वाला एवढा मोठा विजय मिळाला आहे. सौ.संगीताताई महेश बोल्लमवाड यांनी तब्बल ५ हजार एवढ्या मताधिक्क्याने नगराध्यक्षपदावर नाव कोरले आहे तर त्यांच्यासोबतच मराठवाडा जनहित पक्षाचे तब्बल १५ नगरसेवक निवडून आले आहेत. धर्माबाद नगर परिषदेअंतर्गत १ नगराध्यक्ष आणि ११ प्रभागांसाठी २२ नगरसेवक पदासाठी सार्वत्रिक निवडणूक घेण्यात आली. यामध्ये थेट नगराध्यक्ष पदासाठी खुल्या (महिला राखीव) प्रवर्गाला आरक्षण सोडत जाहीर झाली होती.  २०१६ नंतर तब्बल नऊ वर्षांनी आज ही निवडणूक पार पडली आहे. कोरोना,नंतर ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून सतत ४ वर्षे लांबणीवर पडलेल्या निवडणुकांसाठी उमेदवारांसह जनता पण आतुर होती. प्रत्येक पक्षांनी सुद्धा आपापली रणनीती आखली होती. मात्र घडले ते आश्चर्यजनकच ! भारतीय जनता पक्ष आणि शंकर अण्णा उर्फ महेश बोल्लमवाड यांच्या माध्यमातून स्थानिक नेतृत्वातून उदयास आलेल्या मराठवाडा जनहित पक्ष या दोघांमध्ये या निवडणुकीची लढत दिसून येत होती. यामध्ये शंकरअण्णा बोल्लमवाड यांनी सूक्ष्म नियोजन आणि सर्व धार्मियांना विश्वासात घेत आपली प्रत्येक प्रभागात पकड मजबूत केली होती. सर्व धर्मियांसोबत निर्माण केलेला सलोखा त्यांना मताधिक्य गाठण्यास उपयुक्त ठरला. नगराध्यक्ष पदासह एकूण ११ प्रभागातील २२ सदस्यांपैकी १५ सदस्य मराठवाडा जनहित पक्षाचे निवडून आले आहेत. नगराध्यक्ष पदासाठी रिंगणात असलेल्या मराठवाडा जनहित पक्षाच्या वतीने पक्षाचे प्रमुख शंकर बोल्लमवाड यांच्या अर्धांगिनी सौ.संगीताताई महेश बोल्लमवाड यांचा तब्बल पाच हजार एवढ्या मताधिक्क्याने विजय झाला. तर भारतीय जनता पार्टीला केवळ सात जागांवर समाधान मानत दारुण पराभव पत्करावा लागला. उपरोक्त पक्षांसोबतच निवडणुकीत उतरलेल्या काँग्रेस,राष्ट्रवादी – अजित पवार गट, राष्ट्रवादी शरद पवार गट, शिवसेना – ठाकरे आणि शिंदे गट,वंचित बहुजन आघाडी,समाजवादी पार्टी, एम आय एम यांना आपले खातेही उघडता आले नाही.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments