घनसावंगीत भाजपला खिंडार; तालुकाध्यक्ष पुरुषोत्तम उढाण यांचा शिवसेना (शिंदे गट) मध्ये जाहीर प्रवेश
आमदार हिकमतदाद उढाण यांच्या नेतृत्वावर विश्वास; राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता
जालना/प्रतिनिधी/ घनसावंगी तालुक्यातील राजकारणात रविवारी मोठी उलथापालथ झाली.भारतीय जनता पार्टीचे घनसावंगी तालुकाध्यक्ष पुरुषोत्तम उढाण यांनी भाजपला रामराम ठोकत, घनसावंगीचे आमदार हिकमतदाद उढाण यांच्या हस्ते शिवसेना (शिंदे गट) मध्ये जाहीर प्रवेश केला.या पक्षप्रवेशामुळे तालुक्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून,आगामी काळात राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पुरुषोत्तम उढाण यांचा राजकीय व सामाजिक प्रवास संघर्षमय आणि लोकाभिमुख राहिला आहे.बानेगांव येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीपासून त्यांनी सार्वजनिक जीवनाची सुरुवात केली.त्यानंतर बानेगांव ग्रामपंचायत, पुढे घनसावंगी पंचायत समिती सदस्य म्हणून कार्य करत त्यांनी शेतकरी व सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठवला.
समृद्ध शुगरचे चेअरमन सतीश घाटगे यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी तालुक्यातील शेतकरी चळवळीला बळ दिले.पीकविमा प्रश्न,घरकुल योजना,निराधार योजना,श्रावणबाळ योजना यांसह विविध लोककल्याणकारी योजनांसाठी त्यांनी आंदोलने करून प्रशासनाकडून न्याय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
तालुक्यातील शेतकरी,कष्टकरी आणि गरजू घटकांसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करणारे नेतृत्व म्हणून पुरुषोत्तम उढाण यांची ओळख आहे.मात्र भाजपमध्ये काम करत असताना लोकहिताच्या कामांना अपेक्षित पाठबळ व न्याय मिळत नसल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.याच पार्श्वभूमीवर त्यांनी भाजपमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले.
आमदार हिकमतदाद उढाण यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून तसेच शिवसेनेच्या लोककल्याणकारी विचारधारेने प्रेरित होऊन आपण शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश केल्याचे पुरुषोत्तम उढाण यांनी स्पष्ट केले.
यावेळी आमदार हिकमतदाद उढाण यांनी उढाण यांचे पक्षात स्वागत करत सांगितले की,
“शेतकरी व सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढणारे नेतृत्व शिवसेनेत आले असून, याचा निश्चितच घनसावंगी तालुक्याच्या विकासाला फायदा होईल.”
या प्रवेशामुळे घनसावंगी तालुक्यात शिवसेना (शिंदे गट) अधिक बळकट झाली असून, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग येण्याची चिन्हे दिसत आहेत.