ज्ञानेश्वरी मुंडेंची खा.सोनवणेंनी घेतली भेट; भाऊ म्हणून पाठीशी राहण्याचा शब्द
जिल्हा रूग्णालयात सुरू आहेत उपचार, योग्य उपचार करण्याचे डॉक्टरांना सुचना
बीड/ परळी येथील व्यापारी महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी बुधवारी (दि.१६) सकाळी बीड पोलीस अधीक्षक कार्यालयाबाहेर कुटुंबासह आत्मदहनाचा प्रयत्न केला. त्यांच्यावर जिल्हा रूग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून दि.१७ जुलै रोजी सायंकाळी खा.बजरंग सोनवणे यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी तुमचा भाऊ म्हणून मी पाठीशी असून तूम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी मी लढा देईल, असा शब्दही खा.सोनवणे यांनी दिला.
परळी येथील व्यापारी मुंडे यांचा ऑक्टोबर २०२३ मध्ये निर्घृण खून झाला होता. या घटनेला आता अठरा महिन्यांहून अधिकचा काळ लोटला आहे पण या प्रकरणी अद्याप कुणालाही अटक झाली नाही. तपासाला विलंब होत असल्याने ज्ञानेश्वरी मुंडे यांनी बुधवारी सकाळी कुटुंबासह बीड पोलीस अधीक्षक कार्यालयापुढे अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी पोलीसांनी रोखले परंतु त्यानंतर त्या गाडीत बसण्यासाठी गेल्या परंतु त्यांनी फ्रुटीच्या बाटलीत असलेले कोणते तरी विषारी द्रव केले आणि त्या जमिनीवर कोसळल्या. यानंतर पोलिसांनी तातडीने त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केलेले आहे. दि.१७ जुलै रोजी खा.बजरंग सोनवणे हे मुंबईहून परतले. त्यांनी केजला न जाता आधी जिल्हा रूग्णालयात धाव घेतली. उपचार सुरू असलेल्या ज्ञानेश्वरी मुंडे यांची त्यांनी भेट घेत अस्तेवाईकपणे चौकशी केली. ताई, तूम्ही आत्महत्या करण्याचा विचार करण्याआधी लेकरांच्या तोंडाकडे बघायचे होते. या लेकरांसाठी खंबिर व्हा, तूम्हाला न्याय देण्यात हे सरकार कमी पडत आहे. परंतु तूमच्या लढाईत मी स्वत: तुमचा भाऊ म्हणून तुमच्या पाठिशी आहे, या लढाईत मी तुमच्या सोबत खांद्याला खांदा लावून लढेल, असा शब्दही त्यांनी यावेळी दिला.
चौकट
माझ कुटूंबच या लोकांनी उध्दस्त केले. मी न्यायासाठी रोज प्रशासनाच्या दारात जाते. सोबत लेकरांना घेवून जाते, तरीही या निर्दयी लोकांना मायेचा पाझर फुटत नाही. गरीबांसाठी न्याय असतो का नाही, हेच कळायला तयार नाही. रोज पोलीस ठाण्यात जाताना लेकरांची शाळा बुडत आहे. अशावेळी माझ्या मनाला प्रचंड वेदना होतात.