भारतीय हॉकीचे सुवर्णयुग पुन्हा अवतरेल!
भारतीय पुरुष हॉकी संघाने दक्षिण कोरियासारख्या मात्तबर प्रतिस्पर्धी संघाला ४- १ अशा गोल फरकाने मात देत आशिया चषकावर नाव कोरत इतिहास घडवला. बिहारच्या राजगिर येथे नुकतीच आशिया चषक हॉकी स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत आशिया खंडातील अनेक दिग्गज देश सहभागी झाले होते. आशिया चषक सारख्या महत्वाची स्पर्धा जिंकून भारताने हॉकी मधील आपले श्रेष्ठत्व पुन्हा एकदा सिद्ध केले. याआधीही भारताने पॅरिस आणि टोकियो ऑलिंपिकमध्ये कांस्यपदक जिंकले होते होते. सलग दोन ऑलिंपिकमध्ये भारताने कांस्यपदक जिंकण्याची कामगिरी केली त्यापाठोपाठ आता आशिया चषकही जिंकण्याची करमत करून भारतीय संघाने इतिहास घडवला. ही स्पर्धा जिंकून भारताने २०२६ साली होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेतील आपले स्थान पक्के केले. संपूर्ण स्पर्धेत भारतीय संघाने दर्जेदार खेळ करत प्रतिस्पर्धी संघाला नामोहरण केले. प्राथमिक आणि सुपर फोर फेरीत भारतच्या सर्वच खेळाडूंनी जीव तोडून खेळ केल्याने भारताला अंतिम फेरी गाठणे सुलभ झाले. अंतिम फेरीत तर भारताने कमाल केली. समोर दक्षिण कोरिया सारखा बलवान संघ असतानाही भारतीय खेळाडूंनी आपला आक्रमक खेळ करत दक्षिण कोरियाचा ४- १ असा धुव्वा उडवला.
अंतिम सामन्यात भारतीय संघाने पहिल्या मिनिटापासून आक्रमक खेळ केला. पहिल्या मिनिटातच भारतीय संघाने पहिला गोल केला. भारताच्या सुखजीत सिंगने हा गोल केला. दिलप्रीत सिंगने २८ व्या मिनिटाला दुसरा गोल केला त्यानेच ४८ व्या मिनिटाला दुसरा गोल केला. अमित रोहिदासने आणखी दोनच मिनिटाने म्हणजे ५० व्या मिनिटाला चौथा गोल केला. दक्षिण कोरियाने प्रतिआक्रमण करण्याचा प्रयत्न केला परंतु भारताची बचाव फळी भेदण्यात त्यांना अपयश आले. या संपूर्ण सामन्यात भारताच्या हॉकी संघाने दर्जेदार खेळ केला त्यामुळेच या स्पर्धेत भारत अंजिक्य ठरला विशेष म्हणजे भारताने तब्बल आठ वर्षानंतर दक्षिण कोरियावर विजय मिळवला.
हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ आहे. एकेकाळी भारतीय हॉकीचा जगभर दबदबा होता. भारतीय संघाने ऑलिंपिक तर अक्षरशः गाजवून सोडली होती. भारताला सर्वाधिक पदके हॉकी या खेळानेच दिली आहेत. ऑलिम्पिकमध्ये भारताने एकूण १३ पदके जिंकली आहेत. यापैकी ८ सुवर्णपदके, १ रौप्यपदक व ४ कांस्यपदकांचा समावेश आहे. असा विक्रम करणारा भारतीय संघ जगातील एकमेव संघ आहे.
गेल्या काही दशकात भारतीय हॉकीला उतरती कळा लागली एकेकाळी जगावर अधिराज्य गाजवणारा भारतीय हॉकी संघ सर्व महत्वाच्या स्पर्धांमध्ये अपयशी ठरू लागला. प्रेक्षकांचाही हॉकी खेळातील रस कमी होऊ लागला. ऑलिंपिकमध्ये पदक मिळवणे हे आपल्यासाठी स्वप्नच ठरले. १९८० मॉस्को ऑलिंपिकमध्ये भारताने कांस्यपदक जिंकले होते त्यानंतर थेट २०२१ मध्ये टोकियो ऑलिंपिकमध्ये पदक मिळवले. मधल्या काळात भारतीय संघ ऑलिंपिकमध्ये फक्त हजेरी लावून येत होता. अनेकदा भारताचा क्रमांक शेवटून पहिला असायचा आता मात्र परिस्थिती बदलली आहे. सलग दोन ऑलिंपिक मध्ये कांस्यपदक आणि आता आशिया चषक स्पर्धेत विजेतेपद मिळवून भारतीय हॉकी संघाने भारतीय हॉकी संघाचे सुवर्ण युग परतत असल्याचे संकेत दिले आहे. भारतीय हॉकी साठी हे शुभ चिन्ह आहे. या विजयाने भारतीय हॉकी खेळाला पुन्हा ऊर्जितावस्था मिळेल. या विजेतेपदामुळे देशातील तरुण मुले हॉकी खेळाकडे वळतील. प्रेक्षकही हॉकीवर पूर्वीप्रमाणे प्रेम करतील. भारतीय हॉकीला पुन्हा अच्छे दिन येतील. भारतीय हॉकीचे सुवर्णयुग पुन्हा अवतरेल. आशिया चषक स्पर्धेतील हे विजेतेपद भारतीय हॉकीच्या सुवर्णयुगाची नांदी ठरेल, यात शंका नाही. आशिया चषक विजेत्या भारतीय हॉकी संघाचे मनापासून अभिनंदन!
-श्याम ठाणेदार