भारत रशिया मैत्रीचा नवा अध्याय
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हेकेखोरपणामुळे भारत आणि अमेरिकेचे संबंध कमालीचे दुरावले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर ५० टक्के अतिरिक्त शुल्क ( टेरीफ ) लावल्यानंतर दोन्ही देशात कटुता निर्माण झाली आहे. सुरुवातीला भारतावर २५ टक्के अतिरिक्त शुल्क ( टेरीफ ) लावणाऱ्या ट्रम्प यांनी भारताने रशियाशी तेल खरेदी करू नये. भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने रशिया त्या पैशातून शस्त्र खरेदी करत आहे आणि त्यामुळेच रशिया युक्रेन युद्ध थांबत नाही. भारत रशियाकडून तेल खरेदी करून एकप्रकारे रशिया युक्रेन युद्धाला उत्तेजन देत आहे असा जावई शोध लावतानाच ट्रम्प यांनी भारताने रशियाकडून तेल खरेदी केले तर अमेरिका भारतावर ५० टक्के अतिरिक्त शुल्क लावेल असा इशारा दिला अर्थात भारताने त्यांच्या इशाऱ्याकडे डोळेझाक केले त्यामुळे चिडलेल्या ट्रम्प यांनी भारतावर ५० टक्के अतिरिक्त शुल्क लावले. या अतिरिक्त शुल्कामुळे भारत घाबरून रशियाशी असलेला व्यवहार थांबवेल आणि रशियाकडून तेल खरेदी करण्याचे थांबवेल असे ट्रम्प यांना वाटले होते झाले मात्र उलटेच. भारताने रशियाकडून तेल खरेदी करणे तर थांबवले नाहीच उलट रशियाशी असलेले जुने मैत्रीचे संबंध आणखी दृढ करण्याचा प्रयत्न केला. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी फोनवरून संवाद साधत चर्चा केली. आता भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे रशियाच्या दौऱ्यावर गेले आहेत. अमेरिकेशी आलेल्या कटुतेच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची असल्याने या भेटीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागून आहे. एस जयशंकर यांनी या भेटीत रशियाचे राष्ट्राध्यक्ष वाल्दिमिर पुतिन यांची भेट घेतली या भेटीत अनेक विषयावर चर्चा झाली मात्र भेटीचा मुख्य अजेंडा हा अमेरिकेची दादागिरी हाच होता. या बैठकीत भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी पुतिन यांच्यासमोर अमेरिकेच्या दुहेरी नीतीचा पर्दापाश केला त्यामुळे अमेरिकेला योग्य तो संदेश दिला गेला. अमेरिकेची दुहेरी नीती म्हणजे ज्या अमेरिकेने भारत रशियाकडून तेल खरेदी करतो म्हणून भारतावर ५० टक्के शुल्क लावले त्याच अमेरिकेने चीनवर मात्र अतिरिक्त शुल्क लावण्यास ९० दिवसांची स्थगिती दिली. विशेष म्हणजे चीन रशियाकडून भारतापेक्षा अधिक प्रमाणात तेल खरेदी करतो. भारताला दम देऊन अतिरिक्त शुल्क वसूल करणारा अमेरिका मात्र चीन समोर फुसका बार ठरतो हेच यातून सिद्ध होते. अमेरिकेने भारतावर अतिरिक्त शुल्क लावल्याने दोन्ही देशांच्या संबंधात कटुता निर्माण झाली असल्याने अनेकांनी चिंता व्यक्त केली असली तरी म्हणतात ना वाईटातूनही चांगले घडते तसेच इथेही घडत आहे. अमेरिका आणि भारताचे संबंध बिघडले असताना भारत आणि रशियाचे संबंध मात्र पूर्वीप्रमाणे दृढ होत आहे. रशिया हा तसा भारताचा सर्वात विश्वासू आणि सर्वात जुना मित्र. पंडित नेहरूंपासून सुरू झालेली ही मैत्री आजही कायम आहे. ज्या ज्या वेळी भारतावर संकट आले त्या त्या वेळी रशियाने आपली मैत्री निभावली हे मान्यच करावे लागेल. १९६५ आणि १९७१ साली झालेल्या भारत पाकिस्तान युद्धात रशिया भारताच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला या उलट अमेरिकेने प्रत्येक वेळी पाकिस्तानची तळी उचलली. आताच्या ऑपरेशन सिंदूरमधील अमेरिकेची भूमिकाही पाक धार्जिणीच होती हे संपूर्ण जगाने पाहिले आहे. मधल्या काळात भारत आणि रशियाचे संबंध पूर्वीप्रमाणे दृढ राहिले नव्हते. विशेषतः ट्रम्प पहिल्यांदा सत्तेत आल्यापासून भारत अमेरिकेकडे झुकू लागला असे रशियाला वाटत होते अर्थात त्याला नमस्ते ट्रम्प, हाव दि मोदी हे कार्यक्रमही कारणीभूत होते शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्रम्प यांचा माय डिअर फ्रेंड डोनाल्ड असा जाहीर उल्लेख करत असल्याने तसा रशियाचा समज झाला आणि ते स्वाभाविकच आहे. त्यामुळेच रशिया चीनकडे झुकली होती आता ट्रम्प यांच्या या कृतीने पुन्हा दोन्ही मित्र एकत्र आले आहेत. रशिया ही महासत्ता आहे आणि भारत होऊ घातलेली महासत्ता आहे. हे दोन देश पुन्हा एकत्र आले त्याचा जागतिक पटलावर मोठा परिणाम होणार आहे. त्याचा सर्वाधिक फटका अर्थात अमेरिकेलाच होणार आहे असे जाणकार सांगतात. अमेरिकेच्या संयुक्त राष्ट्रातील माजी राजदूत निकी हॅले यांनी याच मुद्द्यावर बोट ठेवत ट्रम्प यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे ट्रम्प यांच्या या कृतीमुळे अत्यंत महत्वाच्या काळात भारत अमेरिका संबंध तणावपूर्ण बनले आहे. ट्रम्प चीनसारख्या प्रतिस्पर्ध्यांशी सौम्य भूमिका घेताना भारतासारख्या सौहार्दपूर्ण संबंध असलेल्या देशाशी संबंध बिघडवत आहे. ट्रम्प यांच्या धोरणामुळे भारत, रशिया आणि चीन यांच्यातील परस्पर संबंध बळकट होईल त्याचा फटका अखेर अमेरिकेलाच बसेल. निकी हॅले यांना जे समजते ते ट्रम्प यांना का समजत नाही हा प्रश्न आहे. पण काहीही असो ट्रम्प यांच्या हेकोखोरपणामुळे भारत रशिया मैत्री संबंधाचा नवा अध्याय लिहिला जात आहे हे मात्र नक्की .
-श्याम ठाणेदार