बिबट्या मारणे आहे?
‘बिबट्याला मारायला हवे.’ दोन व्यक्तीचं संभाषण. ‘अलिकडील काळात बिबट्या जास्त दिसतोय. तो आपली मुलं नेताय, आपल्याच डोळ्यासमोरून, आपल्याच गावात शिरुन आणि आपल्या गोठ्यातील जनावरंही नेतोय. आपल्याच शेतात आपल्याला क्षती पोहोचवतोय. आपलं जगणं त्यानं कठीण करुन टाकलंय. आज आपण त्यांचा बंदोबस्त लावू शकतो. कारण त्यांची संख्या कमी आहे. उद्या त्यांची संख्या वाढल्यास तेच आपला बंदोबस्त लावतील. कारण ते मांसभक्षक प्राणी आहेत. शाकाहारी नाहीत.’ दोन व्यक्तींचं संभाषण. ते खरंही होतं. कारण बिबट्यानं तिरोडा भागातील एका गावातील एका दांपत्याचा चार वर्षाचा मुलगा सकाळी थंडीमध्ये बाहेर शेकोटीजवळ हात शेकत असतांना प्रत्यक्ष आईवडीलांसमोरच उचलून नेला होता.
बिबट्या आज लोकांना अतिशय त्रासदायक ठरलेला आहे. मागे नागपूर सारख्या शहरात दोन बिबटे शिरुन त्यांनी लोकांना त्रास दिला. त्यातच ते शहरात शिरल्यानं त्यांना पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न घडले. कारण ते मा. मुख्यमंत्री महोदयाच्या गावात होते. त्यातच त्यावेळेस अधिवेशनही होतं.
नागपूर शहरात शिरलेले ते बिबटे. त्यातच विद्यमान काळात होत असलेलं अधिवेशन. त्यामुळं त्याला पकडण्यासाठी झालेले नव्हे तर केले गेलेले शर्थीचे प्रयत्न. अन् बिबट्या जर शहरात धुमाकूळ माजवत असेल तर त्याला पकडणे तेवढेच गरजेचं आहे. परंतु ही झाली शहरातील गोष्ट. प्रश्न हा उद्भवतो की ग्रामीण भागाचं काय? ग्रामीण भागात तर सतत बिबट्याची भीती असते लोकांना. कारण कितीतरी बिबटे हे ग्रामीण भागात मोकळे फिरत असतात. ते उसाच्या फडात कुठेही दिसतात लोकांना आणि एक नाही तर तब्बल चार पाचच्या समुहानं दिसतात. त्यामुळं त्यांचा बंदोबस्त कसा लावायचा? हा ऐरणीचा प्रश्न लोकांसमोर उभा राहतो.
बिबट्या हा शहरात आला तर गंभीर दखल घेतली जाते आणि ग्रामीण भागात दिसला वा आढळला तर त्याची तेवढ्या प्रमाणात गंभीर दखल घेतली जात नाही. असे कितीतरी बिबटे ग्रामीण भागात सैरावैरा फिरत असतात. एक अशीच घटना. वर्तमानपत्राच्या माध्यमातून झळकलेली. गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्याचा भाग. ज्या भागात डाकराम, सुकळीसारखे कितीतरी लहान लहान खेडे आहेत. त्या भागातील एका गावात थंडीच्या दिवसात थंडी घालविण्यासाठी बसलेल्या आईवडील व मुलांच्या टोळक्यातून त्या मुलाच्या आईवडिलांसमोरुन बिबट्यानं एका चार वर्षाच्या मुलाला उचलून नेले. ते बिबट्याचे त्या मुलाच्या आईवडिलांसमक्ष उचलून नेणं. त्यातच अशावेळेस ते आईवडील मनात इच्छा असूनही काहीच करु शकले नाही. हीच वास्तविकता घडली. ही वास्तविकता काय दर्शवते? ही वास्तविकता दर्शवते की आता गावात जंगलराज निर्माण झालेला आहे व पुर्वी जसे जंगलातून हिंस्र प्राणी कोणत्याही प्राण्यांच्या पाडसांना त्यांच्या डोळ्यासमोर उचलून नेत असत. त्यावेळेस ते प्राणीही काहीच करु शकत नसत. तेच चित्र आज ग्रामीण भागात मानवी वस्तीत दिसत आहे. त्यातच बिबट्यानं त्या इवल्याशा चार वर्षाच्या मुलाला उचलून नेलं व ही गंभीर बाब असली आणि आज चार पाच दिवस त्या घटनेला झाले असले तरी शासनानं त्या नरभक्षक बिबट्याला जेरबंद केलेले नाही वा त्याचा बंदोबस्त लावलेला नाही.
बिबट्या जसा शहरात येतो. तो लोकांना त्रास देतो. तसाच तो ग्रामीण भागातही वावरतो आणि तिथंही लोकांना त्रासच देतो. ही सत्य बाब आहे. मात्र शहरात जसा बिबट्याचा बंदोबस्त लावला जातो. तसा ग्रामीण भागात बिबट्याचा जास्त वावर असूनही त्याच्या बंदोबस्त लावण्यावर प्रश्नचिन्हं लागतं.
ग्रामीण भागातील बिबट्याचा मनमोकळा वावर. त्यातच त्याचं आईवडिलांच्या डोळ्यासमोर लेकरांना उचलून नेणं. त्यातच गावात भीतीदायक वातावरण तयार होणं. या गोष्टी काय दर्शवतात? या गोष्टीवरुन लक्षात येतं की ग्रामीण भागातील लोकांनी घरातच लपून राहावं बिबट्याच्या भीतीनं. बिबट्या आपल्याला धोका करतोय म्हणून लोकांनी कोणत्याच गोष्टीसाठी बाहेर पडू नये. त्यांनी आपल्या स्वतःच्या लहान मुलांनाही शाळेत पाठवू नये. त्यांना शिक्षणापासून वंचीत ठेवावं. त्यांनी कोणत्याच प्रकारचे उद्योगधंदे करु नये. शेतीही पिकवू नये. एवढंच नाही तर निर्धार करुन बिबट्यांचा प्रतिकारही करु नये. कारण प्रतिकार करतांना बिबट्या मरतो. अन् बिबट्याला मारणं म्हणजे एक जीवहत्या. त्याची केस बनेल. खटला चालेल वैगेरे वैगेरे. ती केस लढायला तेवढा पैसा ग्रामीण भागातील लोकांजवळ कुठून? त्यातच शेतकरी वर्गाकडे कुठून? तो तर कर्जबाजारी होतो शेत पिकविता पिकविता. शिवाय तो शेतकरी कर्जापोटी आत्महत्याही करतो. अशा शेतकरी वर्गानं बिबट्याच्या शेतातील मुक्तपणे वावराला कंटाळून त्याची हत्या केली तर ते शुरपण नाहीच. तो खुन आहे. जाणूनबुजून होशात राहून केलेला खुन. शेतकरी बिबट्याच्या हमल्यानं मरतोय ना. मग मरु द्या. परंतु त्याला मारु नका. कारण आपल्याला वन्यप्राणी जगवायचेय. त्यांचं अस्तित्व समाप्त करायचंच नाही.
आज फक्त तिरोडा भागच नाही तर अशी घटना जो जो ऐकतो. तो हादरुन गेल्याशिवाय राहात नाही. आज शेतनापिकीचं संकट प्रत्येक शेतकऱ्यांना सतावतोय. त्यातच साप, विंचवासारखे प्राणीही शेतकऱ्यांसमोर संकट निर्माण करतात. वीज पडल्यानंही शेतकरी मरतोय. त्यातच आता आणखी एक नवीन संकट. बिबट्या दिसणं व तो नरभक्षक ठरणं. शेती कशी पिकवावी? हाच प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झालाय. शेती करण्यासाठी वा मजूरी करण्यासाठी बाहेर पडलं तर बिबट्याची भीती आणि घरातच बिबट्याच्या भीतीनं राहिलं तर उपासमारीनं मरण्याची भीती. काय करावं, हेच आज ग्रामीण भागातील लोकांना सूचत नाही. सरकारही यावर ठोस उपाययोजना करीत नाही. ते कमजोर पडत आहेत. कारण त्यांना बिबट्याची झळ पोहोचत नाही. त्याचं आणखी एक कारण म्हणजे शासन जो चालवतो. त्याला ग्रामीण भागातील झोपड्यात राहावं लागत नाही. त्यांना दररोज बिबट्याशी दोन हात करुन मृत्यूचा सामना करावा लागत नाही. त्यांना आलिशान गाडीत बिबट्यापासून संरक्षण मिळवत बसता येतं. मात्र मरत आहेत ग्रामीण भागातील लोकं. त्या बिचाऱ्यांना कोणत्याच स्वरुपाचं संरक्षण नाही. ना त्यांची घरं मजबूत आहेत. ना त्यांच्या घरातील जनावरांसाठी पुरेसे संरक्षण करणारे गोठे आहेत. आज त्यांची कितीतरी जनावरे बिबट्या एका रात्रीतून उचलून नेतात. अन् आज त्यांनाच नाही तर त्यांची मुलंही उचलून नेत आहेत.
आज ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेती करतांना बिबट्या नावाची नवीनच भीती निर्माण झालेली असून शासनानं त्यांचा बंदोबस्त लावण्यासाठी ठोस उपायोजना करण्याची गरज आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना शस्र वापरण्याची परवानगी द्यावी. जेणेकरुन तो स्वतःचं आत्मसंरक्षण करु शकेल.
पुर्वी शेतात वन्यप्राण्यांपैकी फक्त रानडुकर, हरणं, माकडं व नीलगाई येवून त्रास द्यायचे. ते शेतातील पीक खायचे. एवढंच नाही तर उभ्या पिकांचं नुकसान करायचे. त्यासाठी शेतकरी शेतात पिकांच्या सभोवताल इलेक्ट्री करंट लावायचे. ज्यातून प्राणी मरत व खटले तयार होत. कारण ते प्राणी शाकाहारी होते व त्यांचा शेतकऱ्यांना भक्षक म्हणून त्रास नव्हता. मात्र आता तर शेतात बिबट्याही येवून त्रास देत असल्याने जी भीती शेतकरी किंवा शेतमजूरात निर्माण झाली आहे. ती भीती घालविण्यासाठी शेतकऱ्यांना आत्मसंरक्षण म्हणून बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी काहीतरी शस्र वापरण्याची परवानगी द्यावी. जेणेकरुन शेतकरी बिबट्यापासून आपलं संरक्षण करु शकतील. त्यातच समजा आत्मसंरक्षण करतांना एखादा बिबट मेलाच वा मारला गेलाच तर त्याचा खटला तयार होवू नये. जेणेकरुन शेतकऱ्यांना तुरुंगाच्या कठड्यात उभे राहावे लागेल व त्याचाही त्रास शेतकऱ्यांना होईल.
शेतकरी जगाचा पोशिंदा आहे. त्याला पीक पिकविण्यासाठी अभय देणं आजच्या काळाची गरज आहे. तो जर बिबट्याला घाबरुन घरातच बसून राहिला व शेती पिकवलीच नाही तर उद्या तो तर उपाशी राहून मरेलच. आपणही त्याबरोबर उपाशी राहून मरु. तसं पाहिल्यास वन्यप्राणी रक्षण करणं ही आजची गरज आहे. अन् तेही महत्वाचंच आहे. परंतु त्याचबरोबर ग्रामीण भागही त्यांच्या हल्ल्यापासून सुरक्षीत ठेवणे. ही देखील काळाची गरज आहे. बिबट्या गावात शिरला आहे हे बरोबर आहे. परंतु त्याचं नरभक्षक म्हणून गावात राहाणं हे काही बरोबर नाही. जर तो शाकाहारी असता तर ठीक बाब होती. परंतु तो मांसाहारी आहे. त्याचा बंदोबस्त लावणं गरजेचं आहे. तसाच आजचा बिबट्या हा अतिशय हुशार आहे. तो बिबट्या आता एवढा हुशार झालाय की तो पिंजऱ्यातही शिरत नाही. करंट लावून मारला तर त्याला शासनाची परवानगी नाही. वन्यजीव प्राणीसंरक्षण या कायद्याचं उल्लंघन होतंय. तेव्हा त्यांना मारु नये? हा विचार करण्याऐवजी त्यांना वेळीच संपवावं हाच विचार रास्त ठरेल. उदाहरण एखाद्या उंदराचं देता येईल. जर आपल्या घरात उंदरांची संख्या वाढलीच तर त्यांना आपण विष देवून मारतोच. कारण ते आपल्या घरच्या धान्याचं कपड्यालत्याचं नुकसान करतात. आपण कोंबडे, बकरे कापून खातोच. कारण त्यांची संख्या नियंत्रणात असावी. असं आपल्याला वाटतं. मग बिबट्या तर नरभक्षक आहे. त्याला मारलं तर काय हरकत आहे.
बिबट्या मारणं, ही गोष्ट आजच्या काळाची गरज बनलेली आहे. जर त्याला आज मारण्याची सुरुवात केली नाही तर त्यांची संख्या उद्या आपल्यापेक्षा जास्त होईल व आज ते एखाद्याला मारतात. उद्या बऱ्याच लोकांना ठार करतील यात शंका नाही. म्हणूनच जर बिबट्याचा बंदोबस्त लावायचा असेल आणि त्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवायचे असेल वा शेती करु द्यायची असेल, शेतकऱ्यांना जगवायचे असेल आणि आपणही जगायचं असेल तर बिबटे मारावेच लागेल. नाहीतर आपला विनाश नक्कीच आहे हे तेवढंच खरं.
-अंकुश शिंगाडे