बौध्द लेणीतील सूर्य किरणांचा सोहळा पाहण्यासाठी आलेल्या बौध्द उपासकांचा लेणी बंद असल्याने हिरमोड, प्रवेशद्वारावर कडक बंदोबस्त
खुलताबाद/प्रतिनिधी/ खुलताबाद तालुक्यातील जगप्रसिद्ध वेरूळ लेणी येथे दर वर्षी १० मार्च ला अनुभवता येणारा बौध्द लेणीतील सुर्य किरणांचा सोहळा, या वर्षी नेमका मंगळवारी आल्याने लेणी अभ्यासकांबरोबरच बौध्द उपासकांची मोठी अडचण झाली.
केंद्रीय पुरातत्व विभागाच्या नियमावली नुसार दर मंगळवारी लेणी देखभाल दुरुस्ती व साफसफाई अंतर्गत बंद असते, यंदा १० मार्चला मंगळवार आल्याने बौध्द लेणी क्रमांक ११ मध्ये सुर्यास्ताप्रसंगी सूर्याची किरणे या मूर्तीच्या चेहरयावर पडतात, व मुर्ती तेजोमय होते, हा सोहळा अनुभवण्यासाठी गेल्या आठ नऊ वर्षां पासून या सोहळ्याला उत्सवाचे रुप प्राप्त झाले होते.हा सोहळा यंदा नेमका मंगळवारी आल्याने लेणी बंदच होती, लेणी समोरील प्रवेशद्वारावर गृहरक्षक दलाचे जवान बंदोबस्त कामी तैनात होते. या सोहळ्याला अनुभवण्यासाठी सकाळ पासून असंख्य बौध्द उपासक, लेणी अभ्यासक लेणी बंद असल्याने परतले, मात्र विदर्भातील शेगांव, अकोला, बुलढाणा येथुन आलेल्या बौध्द उपासक महिला, पुरुष लेणी प्रवेशद्वाराजवळ घुटमळत होते, व सुरक्षा रक्षकांना लेणी उघडण्याबाबत विनंती करत होते, मात्र लेणी बंद असल्याने या सर्वांचा पुरता हिरमोड झाला.
