बौद्ध संस्कृती निर्माण करण्यामध्ये बौद्ध विहारांची महत्वाची भूमिका
हॅप्पी सायन्स (जपान)चे साऊथ आशिया खंडाचे प्रमुख कोटा नोगुची यांचे प्रतिपादन
बुद्ध विहारांचे 3 रे दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशनाची सांगता
छत्रपती संभाजी नगर/प्रतिनिधी/ बौद्ध संस्कृती निर्माण करण्यामध्ये बौद्ध विहारांची महत्वाची भूमिका असून बुद्ध विहार हे शिक्षणाचे, ज्ञानाचे केंद्र झाले पाहिजे. केवळ भारतातील बौद्ध विहारांच्या समन्वयाबरोबरच आंतरराष्ट्रीय पातळीवरील बौद्ध विहारांमध्ये समन्वय साधण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. जेणेकरून बौद्ध संस्कृती जगभरामध्ये रुजविण्यामध्ये महत्वाचा वाटा आपण उचलू शकू, असे प्रतिपादन हॅप्पी सायन्स, साऊथ आशिया खंडाचे प्रमुख कोटा नोगुची (जपान) यांनी केले. ते बुद्ध विहार समन्वय समिती द्वारा आयोजित दोन दिवसीय बुद्ध विहारो का 3 ऱ्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या समारोपीय सत्रातून बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एम. ए. वाहुळ हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन, चरित्र व साधने प्रकाशन समितीचे सदस्य सचिव डॉ. प्रदीप आगलावे, भदंत डॉ. चंद्रबोधी, डॉ. सय्यद रफिक पारनेर, बहुजन संघटनचे प्रमुख राहुल खांडेकर, इंजि. अशोक येरेकर, प्राचार्य सुनील वाकेकर, चेतन कांबळे, ऍड. एस. आर. बोडदे,
आदि उपस्थित होते.
प्रास्ताविक करतांना अशोक सरस्वती बौद्ध म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये बुद्ध विहारांचे 3 रे राष्ट्रीय अधिवेशन 22 राज्यातील प्रतिनिधींनी उपस्थिती दर्शवून यशस्वी केले. या अधिवेशनाच्या नियोजनात प्रा. भारत सिरसाट, प्राचार्य सुनील वाकेकर, चेतन कांबळे, राहुल खांडेकर, किशोर सरोदे, विजय बचके यांनी अथक मेहनत घेतली. त्यांच्यामुळेच हे अधिवेशन यशस्वी होऊ शकले.
डॉ. सय्यद रफिक पारनेर बोलतांना म्हणाले की, बुद्ध धम्माच्या आणि मुस्लिम धर्माच्या शिकवणीमध्ये साम्य आहे. त्यामुळे बुद्ध विहार आणि मस्जिद यांच्यामध्ये समन्वय घडवून आणण्याची गरज आहे, त्यासाठी येत्या काळात यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला सकाळी 8.00 वाजता पू. भदंत डॉ. चंद्रबोधी आणि उपस्थित भिक्खू संघाच्या उपस्थितीत बुद्ध वंदना व सुत्तपठन घेण्यात आले. त्यानंतर अशोक सरस्वती बौद्ध यांच्या अध्यक्षतेखाली खुले चर्चासत्र संपन्न झाले त्यामध्ये प्रदीप चकमा (त्रिपुरा), भेरुलामा बौद्ध (राजस्थान), देवी दयाल फुले (हरियाणा), राजेंद्र भालशंकर (नाशिक ), कैलासचंद खाडिया (राजस्थान), मिलिंद माटे(गोवा), सुब्रम्हणी (तमिळनाडू), बनवरीलाल (दिल्ली), डॉ. ओंकार वानखडे, शशिकांत सिंहजी मोहनन (तामिळनाडू), विनोद बौद्ध बिहार, राजेंद्र नरहरी (तेलंगणा), प्रा. बी के खातरकर (मध्य प्रदेश), महेंद्र बुद्धरत्न, विमलभाई मकवाना (गुजरात), ज्ञानप्रकाश बौद्ब (गुजरात), ओमप्रकाश चौधरी (छत्तीसगड, ए के पाटील (पाली परीक्षार्थी), प्रा. घनश्याम धाबर्डे (लेणी संवर्धन), सावित्री मुकुंद नाखले आदींनी सहभाग नोंदवला. बौद्ध विहारांचे समन्वय अधिक व्यापक पद्धतीने करून बुद्ध विहार संस्कृती टिकविण्याची जबाबदारी कशापद्धतीने केली पाहिजे यावर व्यापक स्वरूपात चर्चा झाली.
प्राचार्य डॉ. एम.ए. वाहुळ बोलतांना म्हणाले की, देशभरातील बुद्धाना एकत्रित करण्याच्या हेतूने बुद्ध विहारांचे 3 रे राष्ट्रीय अधिवेशन आज संपन्न होत आहे. आपण आपली संस्कृती निर्माण करण्यासाठी, सामाजिक बदलासाठी व्यापक पातळीवर काम करण्याची गरज असून त्याची सुरुवात उशिराने का होईना मात्र बुद्ध विहार समन्वय समितीने केली असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. भारत सिरसाट यांनी केले तर आभार अमरदीप वानखडे
यांनी मानले.
पारित करण्यात आलेले ठराव.
१) महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे.
२) ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी बौद्धांनी सार्वजनिक, खासगी तसेच मिरवणुकीमध्ये डी. जे. चा वापर करू नये.
३) पाली विद्यापीठाची स्थापना करण्यात यावी.
४) विदेशातून भारतात आणण्यात येणाऱ्या बुद्ध मूर्तीवरील कस्टम ड्युटी, सीमा शुल्क रद्द करण्यात यावे.
५) बौद्धांनी लग्नप्रसंगी उपजातींना मान्यता देऊ नये, असे केल्यास त्या व्यक्तीवर सामाजिक बहिष्कार घालण्यात यावा.