बालविकास प्राथमिक शाळेत नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत व पाठ्यपुस्तके वाटप
जालना/प्रतिनिधी/ कसबा येथील श्रीमती प्रभावतीबाई कोळेश्वर बालविकास प्राथमिक शाळेत 16 जून रोजी शाळेच्या पहिल्या दिवशी नवागतांच्या स्वागतासह शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके वाटप करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महिला मंडळाच्या सचिव सौ. विद्याताई कुलकर्णी या होत्या. याप्रसंगी महिला मंडळाच्या कोषाध्यक्ष सौ. सुनंदाताई बदनापूरकर, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सुजाता परदेशी यांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षीय समारोपात सौ. विद्याताई कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी शाळेमध्ये कब-बुलबुल व स्काऊट -गाईड वर्गाचे उद्घाटन करण्यात आले. सहशिक्षक जॉय श्रीसुंदर यांनी महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट आणि गाईड राज्य प्रशिक्षण केंद्र रामबाग,भोर,पुणे येथे पार पडलेल्या सहा दिवशीय निवासी स्काऊट प्राथमिक प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल संस्था व शाळेच्यावतीने पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यानंतर उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना मान्यवरांच्याहस्ते शालेय मोफत पाठ्यपुस्तके वितरित करण्यात आली,
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ सहशिक्षिका श्रीमती छाया मुधोळकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षिका सौ. पल्लवी सरकाटे यांनी केले तर शेवटी उपस्थितांचे आभार सहशिक्षिका सौ. संध्या मुंढे यांनी मानले. या कार्यक्रमास शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.