बालदिनानिमित्त आज (दि.१४) बालसाहित्यिकांची कार्यशाळा व ग्रंथप्रदर्शन
छत्रपती संभाजीनगर – भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू व भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवार दिनांक १४ नोव्हेंबर रोजी बालसाहित्यिकांच्या कार्यशाळेचे व ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन शासकीय विभागीय ग्रंथालय, समर्थनगर येथे सकाळी ११ वाजता करण्यात आले आहे.
सहाय्यक ग्रंथालय संचालक कार्यालय, शासकीय विभागीय ग्रंथालय आणि युगंधरा मराठी साहित्य, कला व सांस्कृतिक प्रतिष्ठान, छत्रपती संभाजी नगर यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला आहे. कार्यशाळेचे उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड यांच्या हस्ते होणार असून छत्रपती संभाजी नगर विभागाचे सहाय्यक ग्रंथालय संचालक सुनील हुसे हे अध्यक्षस्थानी असणार आहेत. कार्यशाळेस प्रमुख अतिथी म्हणून विभागीय सहाय्यक भाषा संचालक बाबासाहेब जगताप,युगंधरा प्रकाशनच्या सौ सुनीता कावसनकर व पी. यु. जैन माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक विजय पाटोदी प्रमुख अतिथी असणार आहे.
या प्रसंगी बाल साहित्याचे (ग्रंथाचे ) प्रदर्शन भरविण्यात येणार असून ते २० नोव्हेंबर पर्यंत सर्वांसाठी निःशुल्क खुले राहणार आहे.
सदर कार्यशाळेस शहरातील विविध शाळेतील विद्यार्थी व शिक्षक सहभागी होणार असुन वाचनाची आवड असणाऱ्या व काव्य वाचन व लेखन करणाऱ्या नवोदित बालसाहित्यिकांनी उत्स्फूर्तपणे कार्यशाळेस सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी संतोष जाधव यांनी केले आहे.
