भाजपाला लालबागच्या राजाचे आशीर्वाद हवे तर उबाठाला औरंगजेबाचे हवेत
राऊत यांना नागरिकशास्त्राचे अपुरे ज्ञान
भाजपा माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांचे राऊतांवर शरसंधान
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या लालबागच्या राजाच्या दर्शनाने औरंगजेब फॅन क्लबचे प्रवक्ते उबाठाचे खासदार संजय राऊतांना चांगल्याच मिरच्या झोंबल्या आहेत. भारतीय जनता पार्टीला लालबागच्या राजाचे आशीर्वाद हवे, मात्र उबाठा ना औरंगजेबाचे आशीर्वाद लागतात असा सणसणीत टोला भाजपा प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी रविवारी लगावला.
श्री.राऊत यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेत श्री.बन यांनी राऊत यांना खोचक सवाल केले. ते म्हणाले श्री. राऊत यांचा नागरिकशास्त्राचा अभ्यास कच्चा आहे का? नागरिकशास्त्राच्या परीक्षेत त्यांना शून्य गुण मिळाले होते का? कारण मुंबईचा महापौर हा बाहेरचा नसतो तर तो मुंबईचाच नागरिक असतो. मुंबईत मतदानाचा अधिकार ज्याला असतो त्यालाच महापौर होण्याचा अधिकार असतो हा मूलभूत अधिकार राऊत विसरले आहेत. सर्वसामान्य मुंबईकर हा भाजपा आणि महायुतीसोबत उभा आहे त्यामुळे मुंबईचा महापौर हा मराठी माणूस होणार आणि तो ही महायुतीचाच होणार हा विश्वास श्री.बन यांनी व्यक्त केला. हे राऊत यांना ही कळून चुकले आहे त्यामुळे श्री. राऊत यांनी निवडणूकीपूर्वी पराभव मान्य करत शस्त्रे टाकली आहेत अशी टीका श्री. बन यांनी केली. काल केंद्रीय गृहमंत्री अमित भाई शाह काय बोलले, याचे उत्तर मुंबईकर निवडणुकीत देतील असेही श्री. बन यांनी नमूद केले.
ओबीसीतून मराठा आरक्षणाबाबत उद्धव ठाकरे, राऊत यांनी भूमिका स्पष्ट करावी आणि मगच श्री. शाह यांना प्रश्न विचारावेत याचा पुनरुच्चार श्री. बन यांनी केला. मराठा बांधव आझाद मैदानावर आंदोलनाला बसले असताना उद्धव ठाकरे व संजय राऊत यांची आझाद मैदान गाठण्याची हिंमत होत नाही, कारण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच त्यांच्या सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण गेले होते. देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये आल्यावर मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यात आले याची आठवण श्री.बन यांनी करून दिली.
