जालना जिल्ह्यातील बदनापूर व अंबड तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंकडून पाहणी
“एकही एकर क्षेत्र पंचनाम्याविना राहू नये. खरडून गेलेली जमीन आणि विहिरींचेही पंचनामे करा.” – कृषि मंत्री दत्तात्रय भरणे
जालना : “जालना जिल्ह्यात प्राथमिक स्वरूपात २ लाख ५४ हजार एकर क्षेत्राचं नुकसान झालं आहे. तर, ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये प्राथमिक अंदाजानुसार राज्यात ३३ लाख ५१ हजार १७५ हेक्टर म्हणजे ८३ लाख ७७ हजार ९३७ एकर क्षेत्र बाधित आहे. सप्टेंबर महिन्यात जास्त पाऊस पडला आहे. सप्टेंबर पूर्वीचा विचार केला तर नुकसान थोडं कमी होतं. कृषी विभाग आणि महसूल विभागाकडून पंचनाम्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील आज नुकसानग्रस्त भागांची पाहणी करत आहेत त्यामुळे त्यांचं सर्व परिस्थितीवर बारकाईनं लक्ष आहे. लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी शासनाचे प्रयत्न सुरू आहेत.” अशी प्रतिक्रिया कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज जालना जिल्ह्यातील बदनापूर व अंबड तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी केली. सलग पडत असलेल्या पावसामुळं शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असून, शेतकरी अडचणीत सापडला आहेत. परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन मंत्री दत्तात्रय भरणे यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. पाहणीदरम्यान मंत्री भरणे यांनी अधिकाऱ्यांना थेट दूरध्वनीवरून सूचनादेखील दिल्या आणि काही ठिकाणी कामकाजातील सुस्तगतीबाबत नाराजी व्यक्त केली.
पाहणी दरम्यान शेतकऱ्यांनी सोयाबीन, कपाशी, तूर यांसारख्या पिकांचे नुकसान, जमिनीवर पाणी साचल्याने उभ्या पिकांची झालेली हानी, रस्ते व पायाभूत सुविधांवर झालेला परिणाम याबाबत कृषी मंत्री भरणेंना माहिती दिली. यावर गांभीर्यानं लक्ष देत मंत्री भरणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ फोन लावून, एकही शेतकरी पंचनाम्यात वंचित नाही राहिला पाहिजे. नुकसान झालेल्या प्रत्येक शेतकऱ्याचा पंचनामा करण्यात यावा. शेती, गुरं, विहिरी या सर्व गोष्टींचे पंचनामे करा, असे आदेश मंत्री दत्तात्रय भरणे यांनी अधिकाऱ्यांना दिले.
मंत्री भरणे म्हणाले की, “शेतकऱ्यांना न्याय मिळावा ही राज्य शासनाची प्राथमिकता आहे. कुठल्याही शेतकऱ्याला मदतीपासून वंचित ठेवलं जाणार नाही. ज्याचं नुकसान झालं, त्यांचं सगळं नुकसान नोंदवून घ्या. मी तुम्हाला मंत्री म्हणून सांगतो, शेतकऱ्याच्या एक गुंठ्याचा पंचनामा जरी राहिला तर त्याला तुम्ही जबाबदार असाल, असा इशारा त्यांनी अधिकाऱ्याला दिला. शेतकरी खूप अडचणीत आहे. तो वंचित राहणार नाही याची काळजी घ्या.” असेही त्यांनी बजावले.
जालना जिल्ह्यात माहे ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे एकूण २ लाख ५५ हजार ३५१ हेक्टर म्हणजेच ६ लाख ३८ हजार ३७७ एकर क्षेत्र बाधित झालं आहे. यात फक्त सप्टेंबर महिन्यातच २ लाख ४७ हजार ५४१ हेक्टर क्षेत्र बाधित झालं आहे. राज्याचा विचार करता, ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये प्राथमिक अंदाजानुसार ३३ लाख ५१ हजार १७५ हेक्टर म्हणजे ८३ लाख ७७ हजार ९३७ एकर बाधित क्षेत्र आहे. या अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचं मोठं नुकसान झालं असून प्रामुख्यानं सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, ज्वारी, भाजीपाला, फळपिके, मका, इत्यादी पिकांचं नुकसान झालं आहे.
