बाबा हरदेवसिंहजी यांना श्रद्धा सुमने अर्पित समर्पण फक्त शब्दांपुरते सीमित न राहता ते प्रत्येक कृतीतून दिसावे – सतगुरु माता सुदीक्षा जी महाराज
निरंकारी भक्तगणांकडून समर्पण दिवसानिमित्त
बाबा हरदेवसिंहजी यांना श्रद्धा सुमने अर्पित
समर्पण फक्त शब्दांपुरते सीमित न राहता ते प्रत्येक कृतीतून दिसावे
– सतगुरु माता सुदीक्षा जी महाराज
जालना : संत निरंकारी मिशनच्या वतीने समर्पण दिवसाचे औचित्य साधून युगद्रष्टा बाबा हरदेवसिंहजी महाराज यांच्या पुण्यस्मरणार्थ एक भावपूर्ण वर्चुअल संत समागम आयोजित करण्यात आला. सतगुरु माता सुदीक्षा जी महाराज आणि निरंकारी राजपिता जी यांच्या पावन उपस्थितीत 13 मे रोजी आयोजित केलेल्या या समागमात देशविदेशातून लाखो श्रद्धाळूंनी ऑनलाइन सहभाग घेतला.
समर्पण दिवसाच्या निमित्ताने निरंकारी भवन गांधी चमन जुना , जालना येथे विशेष सत्संग समारोहाचे आयोजन करण्यात आले ज्यामध्ये शेकडो भाविक भक्तगणांनी भाग घेतला आणि बाबा हरदेवसिंहजी महाराज यांचे दिव्य जीवन व शिकवणूकीतून प्रेरणा प्राप्त केली.
या दिवशी सतगुरु माता सुदीक्षा जी महाराज यांनी वर्चुअल सत्संगाद्वारे श्रद्धाळू भक्तगणांना संबोधित करताना सांगितले की सतगुरु बाबा हरदेवसिंहजी महाराज यांचे जीवन क्षणोक्षणी प्रेम, त्याग, सेवा आणि दिव्य शिकवणूकींनी परिपूर्ण होते. असेच भक्तिभावाचे समर्पित जीवन आपलेही व्हावे, असे त्यांनी प्रतिपादन केले. समर्पण फक्त शब्दांत न राहता ते आचरणात उतरायला हवे.
सतगुरु मातांनी स्पष्ट केले की खरी श्रद्धा आणि प्रेम हे केवळ बोलण्यातून नाही, तर कृतीतून व्यक्त होतात. जर आपण बाबाजींची शिकवण फक्त सोशल मिडियापुरतीच मर्यादित ठेवत असू, तर ते खरे समर्पण नाही. खरे समर्पण तेव्हाच प्रकट होते जेव्हा आपण आत्मपरीक्षण करून पहावे, की आपण खरोखरच नम्रता, क्षमा आणि प्रेम यांचे पालन करत आहोत का? त्यांच्या जीवनातील प्रत्येक पैलू साध-संगतसाठी मार्गदर्शक होता. समर्पण दिवस ही केवळ एक तारीख नसून, ही एक संधी आहे विचार करण्याची की – आपण खरोखरच आपल्या जीवनाला या शिकवणींशी जोडले आहे का? प्रेम, एकता, मानवता आणि विनम्रता हे आपल्या जीवनात आत्मसात करूनच आपण या दिवसाला खरा अर्थ देऊ शकतो. हाच बाबाजींच्या प्रति खरा आदर आणि समर्पण ठरेल. या प्रसंगी भाविक भक्तगणांनी आपले विचार, गीत, कविता आणि भजनांच्या माध्यमातून बाबाजींच्या करुणा, प्रेम व समर्पणाची अनुभूती पुन्हा जिवंत केली. सतगुरु माताजींनी श्रद्धेय अवनीतजी यांचा सन्मानपूर्वक उल्लेख करताना त्यांना एक खरा गुरसिख म्हटले, ज्यांनी आपल्या आचरणातून समर्पणाचा आदर्श उभा केला. समर्पण दिवसाच्या या व्हर्च्युअल संत समागमामध्ये सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या पावन हस्ते ‘हरदेव वचनामृत’ या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. हे एक सुसंगत व सारगर्भित संकलन आहे, ज्यामध्ये बाबा बाबा हरदेवसिंहजी यांचे दिव्य विचार, उपदेश आणि वचने एकत्रित करण्यात आली आहेत. ‘हरदेव वचनामृत’ हे केवळ एक पुस्तक नसून एक आध्यात्मिक अमृत आहे जे वाचकांना बाबाजींच्या शिकवणूकीच्या गाभ्याशी जोडते. या संग्रहात प्रेम, सेवा, नम्रता, एकता आणि निरंकाराशी दृढ अनुसंधान यांसारख्या मुलभूत तत्वांचे विश्लेषण अत्यंत सोप्या व प्रभावी भाषेत मांडले आहे. हे संकलन म्हणजे बाबाजींच्या अंत:करणाचा आवाज आहे जो भावी पिढ्यांना प्रत्येक युगामध्ये मार्गदर्शक ठरत राहील. निश्चितच, बाबा हरदेवसिंहजी यांची दिव्य प्रतिमा प्रत्येक भाविक भक्ताच्या अंत:करणात एक अमिट आठवण म्हणून कायम राहील. त्यांच्या अमूल्य उपकारांसाठी संपूर्ण निरंकारी परिवार त्यांचा सदैव कृतज्ञ राहील. सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज, बाबाजींची शिकवण पुढे घेऊन जात असून ब्रह्मज्ञानाच्या दिव्य प्रकाशाने संपूर्ण मानवतेला उजळवत आहेत.
