Monday, March 30, 2026
Homeऔरंगाबादअवकाळी पावसामुळे ऊसतोडणीसह गाळप हंगामावर मोठा परिणाम शेतकरी, कामगार चिंतेत – उत्पादन...

अवकाळी पावसामुळे ऊसतोडणीसह गाळप हंगामावर मोठा परिणाम शेतकरी, कामगार चिंतेत – उत्पादन घटण्याची शक्यता

अवकाळी पावसामुळे ऊसतोडणीसह गाळप हंगामावर मोठा परिणाम
शेतकरी, कामगार चिंतेत – उत्पादन घटण्याची शक्यता

घनसावंगी/प्रतिनिधी/ घनसावंगीसह परिसरातील साखर कारखान्यांचा गाळप हंगाम यंदा अवकाळी पावसामुळे विस्कळीत झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या सततच्या पावसामुळे शेतातील ऊसतोडणीचे नियोजन कोलमडले असून, याचा फटका थेट शेतकरी, मजूर आणि साखर उद्योगाला बसला आहे. आधीच हंगाम उशिरा सुरू झाल्याने शेतकऱ्यांची आर्थिक घडी विस्कळीत झाली असताना या पावसाने त्यांच्या चिंता अधिक वाढवल्या आहेत.

शेतातील रस्ते चिखलमय झाल्याने ट्रॅक्टर, ट्रॉली व ट्रकना ऊस वाहतुकीसाठी शेतात प्रवेश करणे कठीण झाले आहे. काही ठिकाणी ऊसपिक पाण्यात बुडाले असून पडझड झालेल्या उसामुळे तोडणी आणि वाहतूक दोन्ही ठप्प झाली आहेत. परिणामी, ऊस शेतातच राहिल्याने पिकाचा दर्जा खालावण्याची व साखरेचा टक्का घटण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मजूर वर्ग सर्वाधिक त्रस्त
अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका ऊसतोड मजुरांना बसला आहे. ओल्या पालावर राहावे लागत असून रोजंदारी बंद झाल्याने मजुरांचे आर्थिक हाल वाढले आहेत. “गाव सोडून आलो हंगामासाठी, पण चार दिवसांपासून पाऊस थांबत नाही. काम नाही, खर्च मात्र वाढलाय,” असे एका ऊसतोड मजुराने सांगितले.
कारखान्यांची तयारी पूर्ण, पण गाळपाला विलंब
घनसावंगी, अंबड परिसरातील प्रमुख साखर कारखान्यांनी गाळपासाठी यंत्रणा, मजूर व वाहतूक व्यवस्था सज्ज ठेवली आहे. मात्र, हवामान अस्थिर असल्याने गाळपास सुरुवात करता येत नाही. त्यामुळे कारखान्यांचा आर्थिक तोटा आणि उत्पादन उद्दिष्टांवर परिणाम होण्याची शक्यता वाढली आहे. अनेक शेतांमध्ये पाणी साचल्यामुळे उसांच्या मुळांवर बुरशी वाढत असून साखरेचे प्रमाण घटले आहे.
काही भागात बैलगाड्या आणि ट्रॅक्टर रस्त्यात अडकण्याचे प्रकार होत आहेत. ऊस कारखान्यापर्यंत पोहोचवण्यास दोन ते तीन दिवस लागल्याने उत्पादनातील साखरेचा टक्का आणखी घटतोय.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments