‘आत्ताच एक्सप्रेस’च्या बातमीचा दणका; गंगापूरमधील मुख्य रस्त्यावरील झाडांची साफसफाई सुरू!
स्ट्रीट लाईटचा प्रश्न अद्याप कायम; अंधारामुळे अपघाताची टांगती तलवार
गंगापूर | प्रतिनिधी गंगापूर शहरातील वैजापूर-गंगापूर या मुख्य रस्त्यावरील डिव्हायडरमध्ये वाढलेल्या धोकादायक झाडांमुळे वाहनधारकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता. या संदर्भात ‘दैनिक आत्ताच एक्सप्रेस’ ने वृत्त प्रसिद्ध करताच प्रशासनाला जाग आली असून, आजपासून या झाडांची साफसफाई आणि फांद्या छाटणीच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे.
बातमीचा झाला सकारात्मक परिणाम
मुख्य रस्त्यावरील डिव्हायडरमध्ये बाभळीची आणि इतर रानटी झाडे मोठ्या प्रमाणात वाढली होती. या झाडांच्या फांद्या थेट रस्त्यावर लोंबकळत असल्याने वाहनधारकांचे नियंत्रण सुटून अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली होती. “प्रशासन अपघात होण्याची वाट पाहत आहे का?” असा संतप्त सवाल नागरिकांमधून विचारला जात होता. ‘आत्ताच एक्सप्रेस’ने या गंभीर समस्येला वाचा फोडताच संबंधित विभागाने तातडीने दखल घेत काम सुरू केल्याने समाधान व्यक्त होत आहे.
स्ट्रीट लाईट केवळ ‘शोभेची वस्तू’
झाडांची साफसफाई सुरू झाली असली तरी, मुख्य रस्त्यावरील पथदिव्यांचा (स्ट्रीट लाईट) प्रश्न अद्याप गंभीर आहे. डिव्हायडरमध्ये बसवलेले पोल सध्या केवळ शोभेची वस्तू बनले आहेत. अनेक दिवसांपासून या पोलवरील दिवे बंद असल्याने रात्रीच्या वेळी हा रस्ता पूर्णपणे अंधारात असतो.
ऊस वाहतूक आणि अपघाताचा धोका
सध्या उसाचा हंगाम जोरात सुरू असल्याने या रस्त्यावरून ऊस भरलेल्या ट्रॅक्टरची मोठी वर्दळ असते. पथदिवे बंद असल्याने आणि अंधारामुळे वाहनधारकांना समोरून येणाऱ्या वाहनाचा अंदाज येत नाही. यामुळे एखाद्या मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. झाडांची साफसफाई केल्याबद्दल प्रशासनाचे आभार मानले जात असले, तरी “आता स्ट्रीट लाईट कधी सुरू होणार?” असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
