अटकळी येथे साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांची 105 वी जयंती उत्साहात साजरी
बिलोली/प्रतिनिधी/ बिलोली तालुक्यातील मौजे अटकळी येथे लोकशाहीर व साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांची १०५ वी जयंती मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी दिपप्रज्वलन व अभिवादनाने झाली. यावेळी अण्णाभाऊ साठे, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज व वस्ताद लहूजी साळवे यांच्या प्रतिमांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले. त्यानंतर माजी सरपंच विनोराव देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले. जयंती मंडळाच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात उपस्थित गावातील व तालुक्यातील मान्यवरांनी अण्णाभाऊ साठे यांच्या कार्यावर प्रकाश टाकत आपली मनोगते व्यक्त केली. प्रमुख पाहुण्यांमध्ये माजी सरपंच विनोराव देशमुख, सरपंच प्रतिनिधी उत्तम बत्तलवाड, उपसरपंच रणवीर डोंगरे, मुख्याध्यापक आर. व्ही. अटकळे, तलाठी प्रणिता काळे, शालेय समिती अध्यक्ष मारोती पोलकमवाड, सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल पोलकमवाड, तसेच विजय मुंडकर, गणपत पोलकमवाड, आयुब पटेल, अतुल मुंडकर, पुरुषोत्तम कुलकर्णी, संजय गायकवाड, शिवाजी गायकवाड, प्रमेश्वर गायकवाड यांचा समावेश होता. उत्कृष्ट सूत्रसंचालन शिवलिंग गायकवाड यांनी केले. जयंती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत गायकवाड, उपाध्यक्ष आकाश गायकवाड, सचिव सतीश सुर्यवंशी यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. दुसऱ्या सत्रात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे तैलचित्र गावातील मुख्य रस्त्यावरून भव्य मिरवणुकीत काढण्यात आले. तिसऱ्या सत्रात सुप्रसिद्ध गायक विश्वनाथ भालेराव व गायिका पूजा आईलवार यांच्या संचाने अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर आधारित पोवाडे, प्रबोधनात्मक गीते व सांगीतिक कार्यक्रम सादर केला. या कार्यक्रमाला मातंग समाज बांधव व महिलांचा मोठ्या संख्येने सहभाग होता. संपूर्ण अटकळी गावात उत्सवी वातावरण अनुभवायला मिळाले.